नागपूर : गांधीजींच्या जीवनावरील धडे गिरवीत, बापूंनी दिलेला सत्य आणि अहिंसेचा मंत्र अंगीकारण्याची शपथ घेत नागपूर मध्यवर्ती  कारागृहातील ८७ बंदीवानांनी गांधी पुण्यतिथीच्या पूर्वदिनी गांधी विचार परीक्षा दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहयोग ट्रस्ट, नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग ट्रस्टचे विश्वस्त आणि गांधी विचार परीक्षेचे विदर्भ विभागीय आयोजक डॉ. रवींद्र भुसारी यांच्या संयोजनात आणि कारागृह व सुधारसेवाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे आणि कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या परीक्षेत १६ महिला, ७१ पुरुष कैद्यांनी भाग घेतला. त्यात फाशीयार्डमधील बंदीवानांनीही सहभागी झाला होता. 

गांधीजींच्या जीवनावरील पुस्तके आणि महात्मा गांधीनी लिहिलेल्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेवर आधारित पुस्तकातून अभ्यास करून कैद्यांनी ८० गुणांची प्रश्नपत्रिका एका तासात सोडविली. ही पुस्तके त्यांना मुंबई सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून मोफत पुरविण्यात आली होती. नागपूर मध्यवर्ती कारागृहासोबतच चंद्रपूर आणि वर्धा येथील कारागृहातील बंदीवानदेखील गांधी विचार परीक्षा देणार असल्याचे परीक्षा संयोजक डॉ. रवींद्र भुसारी यांनी सांगितले.

ह्यूमन राइट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या मुख्य संयोजिका एड. स्मिता सिंगलकर, नागपूर कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे, अतिरिक्त अधीक्षक श्रीमती दीपा आगे, उप अधीक्षक श्रीधर काळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री आनंद पानसरे, बाळासाहेब शिंदे, मनोहर भोसले, तुरुंगाधिकारी दयावंत काळबांडे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीना लाटकर, प्रयास संस्था, मुंबई आणि कारागृह शिक्षक लक्ष्मण साळवे यांनी सदर परीक्षेसाठी महत्वपूर्ण सहयोग दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur central jail prisoner exam mahatma gandhi truth experiment book cwb 76 ssb