नागपूर : समाज मान्य नसलेले वर्तन केल्यामुळे व्यक्ती कैदी म्हणून कारागृहात येतो. गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि व्यक्तीने केलेल्या कृत्याची घृणा करावी. मात्र, तो कारागृहात आल्यानंतर व्यक्ती म्हणून वैर करण्यात येत नाही. हातून घडलेल्या पातकाची शिक्षा भोगायला तो आलेला असतो, त्यामुळे त्याच्याकडे फक्त कैदी म्हणून बघण्यात येते. कारागृहाला अतोनात अन्याय, अत्याचाराची छावणी, अशी ओळख पुसायला हवी. कारागृहात कैद्यांच्या मानसिक व सामाजिक वर्तनात सुधारणा करणे आणि त्याचे समाजात पुन्हा समायोजन करण्याचे विधायक कार्य कारागृह प्रशासन करते, असे मत नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी व्यक्त केले. त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.
वैभव आगे म्हणाले की, राज्यात ६० कारागृहे असून ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यामुळे कैद्यांना सांभाळण्यासाठी कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. गंभीर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीची समाजात किंवा सामान्य नागरिकांमध्ये राहण्याच्या लायकीचा नसल्यामुळेच त्याची कारागृहात रवानगी केली जाते. एक सामान्य व्यक्ती जेव्हा कैदी म्हणून कारागृहात येतो, त्यावेळी त्याची मानसिक स्थिती चलबिचल असते.
कारागृहात प्रवेश केल्यानंतर त्याचे स्वच्छंद जीवन, कुटुंब-नातेवाईक, मित्र-आप्तेष्ट आणि ओळखीचे लोक यांच्यापासून अलिप्त राहण्याची मानसिक तयारी कैद्याची नसते. त्यामुळे कैद्याला कारागृहातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही काळ जोखमीचा असतो. त्याच्या जीवनात आलेल्या अचानक बदलामुळे तो हतबल आणि अस्वस्थ होतो. त्यामुळे एका कैद्याला त्याची शिक्षा संपेपर्यंत कारागृह प्रशासनाला सांभाळावे लागते.
‘वाल्याचा वाल्मिकी’ होण्याची प्रक्रिया किंवा एका गुन्हेगाराचा पुन्हा एक सामाजिक प्राणी म्हणून रुपांतर होईपर्यंतचा प्रवास कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा परिश्रमाचे फलीत असते. नागपूर कारागृहात जरी क्षमतेपेक्षा जास्त कैदी असले तरीही प्रत्येक कैद्यांकडे जातीने लक्ष देण्याची आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आमची असते. कैद्यांची जेवनापासून ते झोपेपर्यंत तसेच त्याच्या वर्तनापासून ते आरोग्यापर्यंत काळजी घेण्याची जबाबदारी कारागृह प्रशासन घेते.
व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कैदी सक्षम
कारागृहात कैदी आल्यानंतर त्याच्याकडे काही विशेष कला-गुण आहे का? याची तपासणी करण्यात येते. तसेच कैद्यांच्या इच्छेनुसार विविध व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये सुतारकाम, गवंडीकाम, लोहारकाम, शिवणकाम, हातमाग, विणकाम, पॉवरलूम, बेकरी, रंगकाम, धोबीकाम, लाकुड कटाई इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच शेळीपालन, गो-पालन, गांडूळखत, मत्स्यपालन यासह व्यवसाय थाटता येईल, अशा कामांचे प्रशिक्षण कारागृहात देण्यात येते. यामुळे कैदी कारागृहाबाहेर गेल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.
कैद्यांचा शिक्षण घेण्याचा अधिकार अबाधित
शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या कैद्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची सोय कारागृहात आहे. अनेक कैदी बीए. एमए, बी.कॉम, एम.कॉम, योगा अभ्यास पदविका आणि अन्य पदविकांना प्रवेश घेतात. त्यांनी अभ्यास करण्यासाठी पुस्तके आणि शिक्षकांची सोय करण्यात येते. शिक्षण घेणाऱ्या कैद्यांना शिक्षेत सुटही दिल्या जाते.
महिला कैद्यांची विशेष काळजी
महिला या मुळातच भावनिक असतात. त्या कुणाच्यातरी गुन्ह्यात नकळत सहभागी असल्यामुळे कैदी बनतात. कारागृहात महिला कैदी सुरुवातीला नैराश्यात जाण्याची भीती असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येते. गर्भवती असलेल्या कैदी किंवा मासिक पाळी सुरु असलेल्या कैद्यांना वेगळा आणि सकस आहार देण्यात येतो. गर्भवती महिलांच्या डोहाळे जेवणापासून तर मुलाचे नामकरण करण्यापर्यंत सर्व कार्यक्रम आम्ही कारागृहात साजरे करतो. कैद्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी जेल प्रशासन घेते. तसेच अन्य महिला कैदी एकमेकींना भावनिक साद देतात तसेच मनधरणी आणि समजूत घालून एकमेकींचे दुःख वाटून घेतात.
गळाभेट : एक भावनिक क्षण
कारागृहात बंदिस्त कैदी कुटुंबांपासून अगदी विभक्त असतात. त्यांना वारंवार मुला-बाळांसह पत्नी, आई-वडिल, भाऊ-बहिणींची आठवण येते. त्यांना डोळ्यांसमोर बघण्यासाठी खूप आतुरलेले असतात. त्यामुळेच ‘गळाभेट’ हा उपक्रम प्रशासनाने सुरु केला. गळाभेटीच्या दिवशी कैद्यांना मुले, पत्नी,कुटुंबियांना कारागृहात भेटू देण्यात येते. मुलगा दिसताच कैदी त्याला छातीला बिलगून धरतात. मुले अंगाखांद्यावर खेळतात. मुलांच्या शब्दांनी मानसिक समाधान मिळते तर स्पर्शांनी भावनिक समाधान त्यांना मिळते. मुले घरी जाताना कैद्यांचे डोळे डबडबलेले असतात. हे क्षण बघून उपस्थित जेल अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावतात.
कैद्यांच्या आरोग्याची काळजी
कैद्यांच्या आरोग्याची काळजी प्रशासन घेते. त्यांना स्वच्छतेचे महत्व आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. योगासने, व्यायाम आणि कसरत करुन घेण्यात येते. तसेच कोणत्याही आजारावर निःशुल्क उपचार करण्यात येतात. कोणत्याही कैद्यासोबत गुन्ह्याचा प्रकार, जात, वय, धर्म, खान-पान यावरुन भेदभाव कधीच केला जात नाही. कैदी नैराश्यात जाऊ नये म्हणून त्यांचे समूपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येते.