नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे याही वयात पायाला चक्री बांधल्यागत दौरे करीत असतात. त्याची चर्चाही होते. पवार यांच्या प्रमाणेच भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुध्दा एकाच दिवशी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहतात. गडकरींनी सुध्दा आता वयाची ६५ वर्षे ओलांडली आहे. प्रकृतीच्याही तक्रारी आहेत. पण उत्साह कायम आहे.
शुक्रवारी १२ जानेवारीला गडकरी यांचे राज्यात चार ठिकाणी कार्यक्रम आहेत. सकाळी ते नागपुरात आहेत. दुपारी ते पुण्यात आहेत, सायंकाळी ते पुन्हा नागपूरच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. या शिवाय ते पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि खेड तालुक्यातील कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. गडकरी यांच्या कार्यालयाने त्यांच्या १२ तारखेच्या कार्यक्रमांची पत्रिका माध्यमांना पाठवली. त्यानुसार गडकरी १०:३० ला नागपूरमध्ये मिहान प्रकल्पातील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दु १:३० वाजता ते पुण्यात वसंतदादा श्युगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा : न्यायालयातील ‘ई-फायलिंग’ला वकिलांचाच विरोध, ही आहेत कारणे
दुपारी ३ वाजता पालखी मार्गाची पाहणी तर ३:४५ ला आळंदी ( जि पुणे) येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे बांधण्यात येत असलेल्या भक्त निवासाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तेथून ते नागपूरला येणार असून ६:४५ ला यशवंत स्टेडियममध्ये आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत. खासदार क्रीडा महोत्सव हा गडकरींचा उपक्रम आहे. गडकरी जेव्हा शनिवार, रविवारी नागपुरात असतात तेव्हाही त्यांचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम असतात. निवडणुका जवळ आल्याने या कार्यक्रमांची संख्याही वाढली आहे. कार्यकर्त्यांनाही ते सतत काम करण्याचा सल्ला देतात.