नागपूर : जिल्ह्यात सुरक्षित प्रसूतीसाठी रामटेक, पारशिवनी तालुक्यात ४ माहेरघरे उभारण्यात येणार होती. परंतु, अद्याप ही माहेरघरे उभारण्यात आली नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेसह विविध स्त्रीरोग व प्रसूतीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या निरीक्षणानुसार प्रसूतीच्या वेळी सुमारे ३० टक्के मातांना जोखीम असते. यामुळे दर लाखामागे ६१ गर्भवती माता दगावतात. मातामृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने माहेरघर ही संकल्पना पुढे आणली. संकल्पनेनुसार गावखेड्यापासून तर तांडा, नक्षल भागातील आदिवासीपर्यंत पोहोचण्याची साधनसुविधा नसताना आरोग्य विभागाने सुरक्षित प्रसूतीसाठी ही योजना सुरू केली होती.
हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर कोणी टाकले विरजण? तर्कवितर्क सुरू…
नागपूर जिल्ह्यात रामटेक, पारशिवनी तालुक्यात ४ माहेरघरे उभारण्यात येणार होती. परंतु, ती अद्यापही उभारण्यात आली नाहीत. दरम्यान, पूर्व विदर्भात गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूरसहित पश्चिम विदर्भात मेळघाट, धारणी, चिखलदरा, यवतमाळ तसेच नंदूरबार या भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला ९१ माहेरघरे उभारली गेली. दुसऱ्या टप्प्यात रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात ४ माहेरघरे उभारण्यात येणार होती. यासाठी निधीची सोय करण्यात आली. कोणत्या ठिकाणी माहेरघर उभारण्यात येतील, ते प्राथमिक आरोग्य केंद्रही निश्चित झाले. मात्र, माहेरघरांचा पत्ता नाही.
राज्यभरात उभारण्यात आलेल्या ९१ माहेरघरांमध्ये सुमारे १० हजारांवर प्रसूती झाल्या आहेत. यात सर्वाधिक प्रसूतीची नोंद गडचिरोली जिल्ह्यांत झाली आहे. गर्भवती मातेसोबत सहायक म्हणून महिला किंवा पुरुषाची मजुरी बुडू नये यासाठी मजुरीचा मोबदला म्हणून दरदिवशी ३०० रुपये दिले जातात.