बुलढाणा : चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांचा फॉर्म ७ व फॉर्म ८ ऑनलाईन भरुन त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून नावे वगळल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केला. या सुनियोजित कारस्थानाचे ‘ ‘नागपूर कनेक्शन’ असल्याचा घणाघाती आरोपही बोन्द्रे यांनी केला. यामुळे चिखली मतदारसंघातील वातावरण तापले असून या प्रकरणी आजपावेतो जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अथवा चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या वतीने खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे या कथित मतदार यादी घोटाळ्यात पाणी मुरत असल्याची चर्चा चिखली मतदारसंघात सुरू झाली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोन्द्रे हे चिखली मतदारसंघातील आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण पाटील यांची भेट घेतली. यावेळी तोंडी आणि लेखी निवेदना द्वारे त्यांनी हे गंभीर आरोप केले आहे. तसेच या घोळाची उच्च स्तरीय चौकशी करून वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे. वगळण्यात आलेल्य मतदारात प्रामुख्याने मुस्लिम, मागासवर्गीय बहुल, हिंदु मविआच्या मतदाराची नावे रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने निवडणूक विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मविआच्या मतदारांना मतदानापासून रोखण्याचे हे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केला आहे.

हे ही वाचा…पत्‍नीला ‘नको त्या’ अवस्‍थेत बघितले… अन् जे घडले ते धक्कादायक …

आरोप आणि दावे

यासंदर्भात राहुल बोंद्रे म्हणाले की, या अगोदरही गहाळ मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी पोळ, तहसीलदार कोकाटे यांच्याकडे नावे कायम ठेवण्याची मागणी केली आहे. चिखली शहरात हे मतदार २५-३० वर्षांपासून राहत असून मागील अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र कुणा अज्ञात व्यक्तींनी त्यांची नावे त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून रद्द करण्यासाठी फॉर्म ७ व फॉर्म ८ अर्ज ऑनलाईन भरले. संबंधित ‘बीएलओ’ने याची पुष्टी केली असा बोन्द्रे यांचा दावा आहे. या मतदारांना मतदानापासून रोखण्याचे हे षडयंत्र आहे. अज्ञात व्यक्तीने भरलेल्या फॉर्म ७ चा ‘स्क्रीनशॉट’ आणि अर्जाचा संदर्भ क्रमांकही आम्ही तक्रारीत नमूद केला आहे. या मागे कोण आहे याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असल्याचेही राहुल बोंद्रे यांनी सांगितले.

हे ही वाचा…खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की …

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव ?

देशालील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या मताचे जेवढे मूल्य आहे. तेवढेच सर्वसामान्य गोरगरीब जननेतेच्या मताला, हा मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने बहाल केला आहे. मात्र चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे हुकुमशाही कृत्य केल्या जात असल्याचे बोंद्रे म्हणाले. जिल्ह्यातून प्राप्त अश्या आशयाच्या तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या चिखली विधानसभा मतदरासंघातील आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम, मागासवर्गीय बहुल, हिंदू मविआच्या मतदाराची नावे वगळणे ही लोकशाहीची हत्या आहे. षडयंत्राचा वापर करुन हजारो मतदारांची नावे जशी वगळण्यात आली तसी सोयीच्या राजकारणासाठी अनेकांची नावे घुसाळण्यात आल्याची बाब निषेधात्मक आहे. चिखली मतदारसंघाचा संबध थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाशी असल्याने त्यांचा कुठे दबाव तर नाही ना ? याची चौकशी होवून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.