नागपूर : शंकरनगर ते रामनगरकडे जाणाऱ्या ‘रस्त्या’वरील बहुमजली इमारतीत असलेल्या पबमुळे परिसरातील शांतता भंग झाली आहे. पबमध्ये येणारे तरुण-तरुणी अंमली पदार्थांच्या धुंदीत रस्त्यावरच गोंधळ घालतात. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या पबचा परवानाच रद्द करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी धरमपेठमधील नागरिकांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बहुमजली इमारतीत एक आलिशान पब आहे. या पबला एका मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे पबचा संचालक पोलिसांच्या कारवाईला घाबरत नाही. या पबमध्ये ड्रग्स, गांजासह अन्य अंमली पदार्थ खुलेआम विक्री करण्यात येते. ड्रग्स मिळत असल्यामुळेच शहरातील उच्चभ्रू तरुण-तरुणींसह महाविद्यालीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची या पबमध्ये गर्दी असते. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत चालणाऱ्या या पबमध्ये रात्री केव्हाही तरुण-तरुणींचे टोळके येतात. नागरिकांच्या घरासमोरच कार उभ्या करुन पबमध्ये जातात. ड्रग्सच्या नशेत नागरिकांच्या घरासमोरच लघुशंका करतात. तर अनेकदा कारमधील ‘स्पिकर’वर जोरजोरात गाणी वाजवून नागरिकांची झोपमोड करतात. एखाद्याने त्यांना हटकल्यास ते थेट मारण्यास अंगावर धावतात आणि शिवीगाळ करतात. काही तरुण-तरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करतात. आपआपसांत वाद झाल्यानंतर मोठमोठ्याने शिवीगाळ करतात. नेहमी शांत असलेल्या धरमपेठ परिसरात या पबमुळे शांतता भंग झाली असून निवासी परिसराचे रुपांतर व्यावसायिक परिसरात झाले आहे. या पबचा परवाना रद्द करण्यात येऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा…शहरातील ५० ते ६० वर्षांपूर्वीचे पुतळे आजही…..

पबला ‘नाहरकत’ कोणी दिले ?

निवासी भागात जर पब सुरू करायचा असेल तर त्यासाठी परिसरातील नागरिकांचे नाहरकत पत्र घेण्यात येते. मात्र, या पबच्या उद्घाटनापर्यंत एकाही नागरिकांची पबसाठी नाहरकत पत्रावर सही मागितली नाही. त्यामुळे पब बेकायदेशिररित्या सुरु आहे का? असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा…मोठी बातमी! मोहन भागवत यांना मोदी, शहांच्या दर्जाची सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

मद्यधुंद तरुण-तरुणींचा रस्त्यावर गोंधळ

पबमधून खाली आल्यानंतर मद्यधुंद तरुण-तरुणी रस्त्यावर गोंधळ घालतात. या पबमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास आहे. याबाबत आम्ही उपमुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार दिली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनासुद्धा तक्रार दिली आहे. तरीही अद्यापपर्यंत नागरिकांना दिलासा मिळाला नाही. पोलिसांनी वेळीच कारवाई करावी. – रमेश मंत्री,भाजपचे जेष्ठ नेते

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur citizens demand cancellation of pub license in dharampeth amidst noise and drug abuse issues adk 83 psg