नागपूर : राज्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून गृहमंत्र्याचे शहर तस्करीचे केंद्र बनले आहे. गेल्या वर्षभरात उपराजधानीतून जवळपास ३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. यामध्ये २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीच्या एमडी पावडरचा समावेश आहे. पोलिसांनी ११७ आरोपींना अटक करुन अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे जाळे तोडले आहे.
पूर्वी उपराजधानीत गांजाची चोरुन विक्री होती होती. ‘एमडी ड्रग्ज’ केवळ नावापुरतेच विकल्या जात होते. मात्र, आता उपराजधानी अंमली पदार्थ विक्रीचे ‘हब’ झाले आहे. तस्करांनी मुंबईनंतर नागपूरलाच प्राधान्य दिले आहे. तस्करांनी अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, बार-रेस्ट्रॉरेंट, हुक्का पार्लरमधील युवा पीढी आणि पबमधील तरुण-तरुणींना अंमली पदार्थांचे व्यसन लावले. तरुणांना एमडी अगदी सहज मिळेल अशी व्यवस्था केली. नायजेरीयातून आलेली एमडी थेट गोवा-मुंबईतून नागपुरात येत आहे. अनेकदा ड्रग्स तस्करांच्या जाळ्यात पोलीस कर्मचारीसुद्धा अडकले आहेत. पैसे कमविण्याच्या नादात काही पोलीस कर्मचारी ड्रग्स तस्करांशी हातमिळवणी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षभरात पोलिसांनी अंमली पदार्थ ५३ ठिकाणी कारवाई केली. गुन्हे शाखेने (एनडीपीएस) १९ एमडी तस्करांवर सापळा कारवाई करीत २ किलो ६७७ ग्रॅम एमडी जप्त केली. या कारवाईत २.६७ कोटींच्या एमडीसह ३ कोटी १ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली. तसेच पोलिसांनी २८ गांजा तस्करांवर कारवाई करीत ४५ लाख रुपये किंमतीचा २४० किलो गांजा जप्त केला. गुन्हे शाखेने एकूण केलेल्या कारवाईत जवळपास ६ कोटी ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ नागपुरात जप्त झाल्यामुळे गृहमंत्र्याच्या शहरात ड्रग्स-गांजा विक्रीचे केंद्र झाल्याची चर्चा आहे.
कुख्यात गुन्हेगार एमडी तस्करीत
शहरातील कुख्यात कुख्यात गुन्हेगारांचा कल ‘एमडी’ विक्री आणि तस्करीकडे वाढला आहे. खंडणी, खून, अपहरण, बलात्कार अशा गुन्ह्यातील गुन्हेगारसुद्धा एमडी विक्रीकडे वळले आहेत. त्यात मकोकाचा आरोपी सुमित चिंतलवार, पवन ऊर्फ मिहिर मिश्रा, राणू खान, भुरु शेख, राकेश गिरी, गोलू बोरकर, अक्षय वंजारी, सागर चौधरी, अफसर अंडा अशा गुन्हेगारांचा समावेश आहे. तब्बल ३२ गुन्हेगारांवर ड्रग्ज विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा – स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांवर गुन्हे शाखेने अंकुश ठेवला असून तस्करांचे ‘नेटवर्क’ तोडण्यात आम्हाला यश आले आहे. ‘ड्रग्स फ्री नागपूर’ ही मोहिम हातात घेऊन पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरु आहे. – राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.