नागपूर: गेल्या आठवडाभरापूर्वी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्यात. शहर पोलीस दलातून १२ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी बदलून गेले तर ८ पोलीस निरीक्षक शहरात रुजू झाले. तसेच काही ठाणेदारांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता आयुक्तालयाअंतर्गत पोलीस निरीक्षकांमध्ये मोठे फेरबदल होणार आहे. यावेळी अनुभवी अधिकाऱ्यांना ‘ठाणेदारी’ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर पोलीस दलात यापूर्वी जवळपास अर्ध्याअधिक नवख्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदारी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना ‘ठाणेदारी’ झेपली नव्हती. त्यामुळे आयुक्तांना मध्येच ठाणेदारांच्या बदल्या कराव्या लागल्या होत्या. सध्या नागपूर पोलीस दलातून १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात झाल्या आहेत. तर नागपुरातही ८ पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत.
हेही वाचा… गुजरातमधील दोषी व्यक्ती ‘माफसू’च्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत! कुणाचा आहे दबाव….
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आयुक्तालयातून काढण्यात आले. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर अन्य पोलीस अधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे. पारदर्शक बदल्यांसाठी ओळखले जाणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आता गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि ठाणेदारपदावर नव्याने नियुक्त्या देणार आहेत. येत्या दोन दिवसांत बदल्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
हेही वाचा… राजकीय वर्तुळात चर्चा! आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे तातडीचे निमंत्रण
सध्या शहरातील कोतवालीचे ठाणेदार मुकुंदा ठाकरे, लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे, सक्करदराचे ठाणेदार धनंजय पाटील, सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनिस आणि अंबाझरीचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांची बदली अन्य ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच वाहतूक शाखेतील मनीष बनसोड आणि मधुकर मत्ते यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तर किशोर नगराळे, राजकमल वाघमारे आणि विद्या जाधव यांची आयुक्तालयातून बाहेर जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यामुळे वाहतूक शाखेत जवळपास ६ ते ७ पोलीस निरीक्षकांची बदली होणार आहे. विशेष शाखा आणि आर्थिक शाखेतही बदल होणार आहेत.
अनुभवी अधिकाऱ्यांना संधी
शहरातील जवळपास १० ते १२ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदल्या होण्याची शक्यता आहे. नागपुरातील गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान बघता आता अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांना ‘ठाणेदारी’ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांना ठाणेदारी देण्याची शक्यता आहे. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.