नागपूर : नेपाळमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय खुल्या कबड्डी स्पर्धेत नागपूर शहर पोलीस दलातील महिला संघाने सहभाग घेत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नेपाळमध्ये सुवर्णपदकाची कमाई करण्याचा विक्रम करणाऱ्या संघाच्या यादीत नागपूर पोलीस दलाचा पहिला क्रमांक लागतो.
नेपाळमधील पोखरा शहरात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नागपूर पोलिसांचा महिला कबड्डी संघ सहभागी झाला होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या नागपूर पोलीस महिला संघाचे नेतृत्व पोलीस कर्मचारी अनिता रेडी आणि अलका ठेंगरे यांनी केले. संघाने पहिल्याच सामन्यात जपान पोलीस संघाला धूळ चारली तर एकही सामना न गमवता थेट अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर अंतिम फेरीत नेपाळ संघाला पराभूत करून स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. विजेत्या संघात कर्णधार अनिता रेड्डी, उपकर्णधार अलका ठेंगरे, कविता डेहनकर, सीमा चौधरी, सरिता नैनवार, राधिका गाडगीळ, पूनम मेश्राम, रश्मी बन, अर्चना कुरे, दीपा गोईकर, हेमलता राऊत, शुभांगी, रत्ना बावणे, शीतल जयस्वाल यांचा समावेश आहे.
हेही वाचा…VIDEO : ताडोबात दोन वाघांमध्ये युद्धाचा थरार…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेत्या संघाची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच पोलीस उपायुक्त गोरख भामरे, वादग्रस्त ठाणेदार मुकुंद ठाकरे, निरीक्षक अमिता जयपूरकर यांनी विजेत्या संघाला सुवर्णपदकासह स्वागत केले. अनिता रेड्डी आणि अलका ठेंगरे या दोन्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी खेळाडू असून त्यांनी नागपुरातील गरीब मुलींना निःशुल्क कबड्डी प्रशिक्षण देत सामाजिक वसा जपला आहे.