नागपूर : शिक्षणतज्ञ आणि पर्यावरणवादी ‘थ्री इडियट फेम’ सोनम वांगचूक आणि लडाखच्या जनतेच्या समर्थनार्थ नागपूरच्या स्वयंसेवी आणि नागरिकांनी रविवारी, १७ मार्चला सायंकाळी साडेचार वाजता संविधान चौकात हवामान संपाची हाक दिली. यात शहरातील शेकडो नागरिक, पर्यावरणप्रेमी सहभागी झाले.
डॉ. सोनम वांगचूक आणि लडाखचे लोक सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीची मागणी करीत आहेत. ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वायत्तता आणि अधिकार देऊन लडाखचा नैसर्गिक वारसा जतन करण्यात मदत होईल. खाणकाम किंवा जलद औद्याोगिकीकरणासारख्या विकासाच्या नावाखाली कोणत्याही अनियोजित आणि अनियंत्रित कामाचा केवळ या प्रदेशावरच नव्हे तर संपूर्ण भारतावर विनाशकारी परिणाम होईल. त्यामुळे डॉ. सोनम वांगचूक शून्याखालील तापमानात २१ दिवसांचे उपोषण करीत आहे. सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करण्याची मागणी वांगचूक आणि जनता करीत आहे.
हेही वाचा…वसंतात आकाश नवलाई; आकर्षक घडामोडींची पर्वणी, वाचा सविस्तर…
वांगचूक यांच्या आवाहनानुसार त्यांचे लाखो शुभचिंतक, अनुयायी तसेच पर्यावरण आणि निसर्गप्रेमींनी १७ मार्चला देशव्यापी हवामान संप किंवा उपोषणाचे आवाहन केले होते. लोकशाही आणि शांततापूर्ण पद्धतीने हा संप करण्यात आला.