नागपूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून बदलापूर घटनेचा निषेध केला आहे. महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. उच्च न्यायालयाने राजकीय पक्षचा बंद बेकायदेशीर ठरवल्याने बंदचे रुपांतर मूक आंदोलनात करण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन व्हरायटी चौकात तर काँग्रेसचे आंदोलन संविधान चौकात सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर लक्ष नसून कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा महाविकास आघाडीचा आरोप आहे. आता प्रदेश युवक काँग्रेस ने देखील हाच मुद्दा उचलून धरला आहे. राज्यात महिलावरील अत्याचारात वाढ झाली आहे. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. पण, गृहमंत्री निष्क्रिय आहेत, असा आरोप फलक हातात घेऊन काँग्रेसने केला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. तसेच दोषींनी शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा…नेते राजकारणात व्यग्र, विदर्भ राज्यासाठी उपोषणकर्ती रुग्णालयात
बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस यंत्रणेसोबतच राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी, तानाजी वनवे, रेखा बाराहाते, अशोक धवड, प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गुन्हेगारांना साथ देणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करत आहे. राज्यात गुन्हेगारीची टक्केवारी वाढली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. लहान मुलींचे शोषण होत आहे. बदलापूरचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. उच्च न्यायालयाने थोबाड लाल केल्यावर कारवाई होते. यातून सरकारची विकृत मानसिकता दिसते. या विकृत सरकारचा निषेध करून दोषींना त्वरित फाशी द्यावी. यासाठी आमचे मूक आंदोलन आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd