नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीला बारा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आसलेला शिक्षक मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि शिक्षक भारतीमध्ये छुपी युती झाल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला शब्द शिक्षक मतदार संघासाठी पाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने अद्यापही शिक्षक मतदारसंघाासदर्भात कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते डॉ. बबनराव तायवाडे यांच्या निकटवर्ती सुषमा भड यांना कास्ट्राईब महासंघाने शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने नवीन चर्चांना ऊत आला आहे.
हेेही वाचा >>> नागपूर : विद्यापीठ विधिसभा निवडणूक रिंगणात ‘शिक्षक भारती’
आमदार ॲड. अभिजित वंजारी यांना पदवीधर मतदारसंघातून विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी एकत्रित प्रयत्न केले होते. काँग्रेस विचारांच्या सर्व संघटनांची मनधरणी केली होती. मतविभाजन टाळण्यासाठी अनेक उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यास सांगतिले होते. यावेळी शिक्षक मतदारसंघातही काँग्रेस इतर संघटनांना मदत करेल अशा शब्द देण्यात आला होता. शिक्षक भारती आणि काँग्रेसमध्ये तशी बोलणीही झाली होती अशी माहिती आहे. यंदा शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस शिक्षक भारतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करेल अशी चर्चा होती. यासंदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही झाल्या आहेत.
हेही वाचा >>> नागपूर : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, दोन युवकांचा वाकी नदीत बुडून मृत्यू
मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता काँग्रेस पदवीधर निवडणुकीत दिलेला शब्द पाळणार का? अशी चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि शिक्षक भारतीमध्ये बोलणी सुरू असताना अचानक काँग्रेस नेते बबनराव तायवाडे यांच्या निकटवर्ती असलेल्या सुषमा भड यांना कास्ट्राईब महासंघाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हा काँग्रेसचा छुपा अजेंडा तर नाही ना? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात जानेवारी २०२३ मध्ये निवडणूक होत आहे. यासाठी मतदार नोंदणी सुरू झाली असून सर्वच शिक्षक संघटनांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये आमदार कपिल पाटील समर्थित शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार किशोर वर्भे यांना माघार घ्यायला लावण्यात आली होती. त्यावेळी शिक्षक मतदारसंघात मदतीची बोलणीही झाली होती असे वर्भे यांनी सांगितले. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही. मागील निवडणुकीमध्येही काँग्रेसने ऐन वेळेवर उमेदवार देऊन शिक्षक भारतीच्या मतांची विभागणी केली होती. याचा फायदा गाणार यांना झाला होता. यंदाच्या निवडणुकीत अशी चूक टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसने करावा, अशी मागणी होत आहे.