नागपूर : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी गेल्या आठवड्यात नागपूर जिल्हा परिषदेत केलेल्या आंदोलनावरून जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये बेकीचे दर्शन झाले. काँग्रेसमधून वरिष्ठ नेत्यांची गळती लागली असून आंदोलनातही उघडउघड मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेसची सत्ता असलेल्या या जिल्हा परिषोतील त्या पक्षाच्या सदस्यांनी प्रदेश युवक काँग्रेसला हरकत घेतली आहे. मात्र, स्थिती सावरत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्स (ट्विट) करीत आंदोलनाचे समर्थन केले.
सत्ताधारी पक्षासाठी वि.दा. सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही विषय अतिशय संवदेनशील आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलन किंवा इतर कोणीतीही नकारात्मक बाब खपवून घेतली जात नसल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसने सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवत लागोपाठ दोन आंदोलने केली. त्याचा परिणाम म्हणजे राऊत यांना कारागृहात जावे लागले.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत अलीकडे सक्रिय झाल्याचे दिसून येते. त्यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सावरकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकर यांना माफीवीर संबोधल्याने वादंग निर्माण झाले होते. प्रदेश युवक काँग्रेसने विद्यापीठ सावरकर यांचा प्रचार करीत असल्याचा आरोप करून केलेल्या आंदोलनाने वांदग उडाला होता. त्याविरोधात भाजपच्या युवा आघाडी आंदोलन केले. त्यानंतर कुणाल राऊत यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पण अटक झाली नव्हती. या आंदोलना पाठोपाठ राऊत यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारातील शासकीय योजनांच्या जाहिरात फलकावरील ‘मोदी सरकार’ याशब्दाऐवजी ‘भारत सरकार’ असा नामबदल केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासले. जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेने काँग्रेसचे राजकीय विरोधक सुखावले. तर काँग्रेस जिल्हा परिषदेतील सदस्यांनी या आंदोलनाला विरोध केला. काँग्रेस वरिष्ठ नेते विविध कारणांनी पक्षांत्तर करीत असताना आंदोलनाच्या निमित्ताने देखील गटबाजीचे दर्शन घडवण्यात काँग्रेस मागे दिसत असल्याचे चित्र होते.
हेही वाचा : कोकणात भाजपकडून मित्रपक्षांचीच कोंडी !
जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी या संस्थेमार्फत केली जाते. योजनांची जाहिरात जिल्हा परिषदेच्या आवारात लावण्यात आली होती. जेथे आपण विरोधी पक्षात असतो तेथे असे आंदोलन केले जाते. ही जाहिरात परिषदेच्या आवाराबाहेर असती आणि त्यात काही बदल गेले असते तर काँग्रेसचे सर्व सदस्य युवक काँग्रेसच्या आंदोलनाचे समर्थन केले असते, असा दावा काँग्रेसच्या काही जि.प. सदस्यांनी केला आहे. एकीकडे अशाप्रकारे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये या आंदोलनावरून मतभेद दिसून आले तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (एक्स) टि्वट करून आंदोलनाचे समर्थन केले आहे.