नागपूर: ही माझी नववी निवडणूक आहे, मला कोणाची रसद घेण्याची गरज नाही, असा टोला कॉंग्रेसचे नागपूर लोकसभा उमेदवार व आमदार विकास ठाकरे यांनी शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांना लगावला. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ या सदरात भारतीय जनता पक्षाबाबत गंभीर दावे केले आहेत. नागपूरमध्ये गडकरी यांना पराभूत करण्यासाठी मोदी, शहा, फडणवीस यांनी काॅंग्रेस उमेदवाराला रसद पोहोचवली असा दावा त्यात करण्यात आला. त्याला कॉंग्रेस उमेदवार व आमदार विकास ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
ठाकरे म्हणाले, राऊत यांनी आघाडीचा धर्म पाळावा, कुठलेही पुरावे न देता कॉंग्रेसला रसद पुरवली असे ते कशाच्या आधारावर लिहितात. त्यांना नागपूरची काहीही माहिती नाही. ते वायफळ बोलतात. मी कधीही कोणाची रसद घेतली नाही व मला कोणी रसद घेण्याची गरज नाही. राऊत यांनी यापूर्वी गडकरी यांच्याबाबत प्रेम व्यक्त केले होते आता निवडणुकीनंतरही ते तेच करतात. ते महाविकास आघाडीसोबत आहेत की गडकरी यांच्याबाजूने हेच कळत नाही. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार.
हेही वाचा – ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. त्याशिवाय, सुधीर मुनगंटीवार यांनीही संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय आहे संजय राऊतांच्या लेखात?
संजय राऊतांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. “गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असं संजय राऊत यांनी लेखात म्हटलं आहे. तसेच, “आता भाजपाचं सरकार आलं तर अमित शाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील”, असा दावाही राऊतांनी केला आहे.
हेही वाचा – अकोला : तप्त उन्हात राबताहेत वीटभट्टी कामगार, सुविधांची वानवा अन् समस्यांचा विळखा
बावनकुळेंचं खोचक प्रत्युत्तर
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?” असा सवाल बावनकुळेंनी केला आहे.