नागपूर: दिवाळीत मोठ्या प्रमाणावर मिठाईसह इतर पदार्थाची विक्री होते. या काळात काही विक्रेते अवास्तव नफा कमावण्यासाठी एकीकडे भेसळ तर दुसरीकडे ग्राहकाला मिठाई डब्यात ठेवून त्याचे वजन करून विकतात. त्यामुळे मिठाईच्या दरात डब्याचीही ग्राहकाला विक्री होते. या फसवणुकीबाबत अ. भा. ग्राहक पंचायतने बरेच मुद्दे मांडले आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
दिवाळीमध्ये काही विक्रेते मिठाई, तेल, तुप, खोवा व इतर खाद्यपदार्थामध्ये जास्त नफा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेसळ करून नागरिकांच्या जिवांशी खेळतात. या काळात मिठाईसह इतर खाद्य पदार्थाची कोट्यावधींची उलाढाल होते. या पदार्थात भेसळ करण्याचे प्रमाण वाढत असून यावर अंकूश ठेवण्यासह कारवाईची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाची आहे. परंतु थातूर मातूर कारवाई करन वेळ काढला जातो. या भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा – ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; तीन ठार, दोघे जखमी
दरम्यान जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकांमध्ये वारंवार ग्राहक पंचायतने आवाज उठविल्यावरही थातूर- मातूर कारवाईतून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसल्या जात असल्याची खंतही अ. भा. ग्राहक पंचायतने प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली. नियमाप्रमाणे विक्रेत्याने फक्त मिठाईचे वजन करुन नंतर ते स्वत:च्या दुकानाची जाहीरात करणाऱ्या डब्यामध्ये ठेवून ग्राहकांना दिले पाहिजे. परंतु विक्रेते डब्यांमध्ये मिठाई ठेवून वजन करून ग्राहकाला देतात. त्यामुळे मिठाईच्या दरात डब्याची विक्री होऊन ग्राहकाची फसवणूक होत आहे. एका डब्याचे वजन साधारण ५० ते १०० ग्रॅम असते म्हणजे एवढी एवढी मिठाई ग्राहकांना कमी दिली जाते. हा गंभीर प्रकार असतानाही वजनमाप खाते (वैधमापन शास्त्र विभाग) केवळ तमाशा बघतो. तातडीने ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि वैधमापन शास्त्र विभागाकडून अस्थापनांची तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली.
हेही वाचा – नागपूर : नरेंद्र जिचकारांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला
कारवाई न झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभाग आणि वजनमाप खाते सतत वर्षभर वादग्रस्त आस्थापनांची तपासणी न करता केवळ सनासुदीतच थातूर मातूर कारवाई करत असल्याने विक्रेते आणि संबंधित विभागाचे साटेलोटे तर नाही ना, असा संशयही अ. भा. ग्राहक पंचायतचे ॲड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भटटलवार, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, ॲड. विलास भोसकर, तृप्ती आकांत, संध्या पुनियानी, ॲड. गौरी चांद्रायण आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी केला.