नागपूर : नागपूर महापालिकेच्यावतीने रविवारी स्वच्छता दौड पार पाडली. यावेळी स्वच्छता दौडच्या प्रसिद्धीकरिता लावण्यात आलेल्या होर्डिंगवर राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर उभा झाडू दर्शवण्यात आला आहे. यावरून वाद निर्माण झाला असून राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे कॉंग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत यांनी या पोस्टरवर आक्षेप घेतला. त्यांनी या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ च्या कलम २ अन्वये महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राला महापालिकेने पायदळी तुडवत असल्याचे होर्डिंगवर दाखविले आहे. यावरून देशाचे, राष्ट्रीय झेंड्याचे, राष्ट्रीय चिन्हाचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थित नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने केला असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. भारताच्या राष्ट्रध्वजावर सन्मानाने फडकणाऱ्या अशोक चक्रावरील २४ आऱ्यांवर भारतवासीयांच्या वेगवेगळ्या भावना व अधिकार दर्शवलेले आहेत. याच पवित्र अशोक चक्राच्या चिन्हावर झाडूचे चिन्ह दर्शवून नागपूर महापालिकेला कोणता संदेश पोहोचवायचा आहे? असा देखील प्रश्न डॉ. राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा – एकच व्यक्ती, एकच वेळी शाळेत मुख्याध्यापक अन् बॅंकेत लिपिकही!
महापालिकेने अशोक चक्राला चुकीच्या स्वरूपात शहरातील लाखो नागरिकांसमोर सादर केले. अशोक चक्राच्या विद्रुपीकरणामुळे देशावर प्रेम करणाऱ्यांच्या आणि एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि भडकावणारी चित्र होर्डिंगवर प्रदर्शित करण्यात आली असून लाखो नागरिकांच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे. यावरून मागील १५ वर्षापासून महापालिकेची सत्ता भोगणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे मनुवादी विचारधारेतील मनसुभे पुन्हा एकदा उघड झाले असल्याचे यावेळी डॉ. राऊत म्हणालेत. त्यांनी महापालिकेच्या या कारस्थानाचा तीव्र निषेध केला आहे.
तरुणांनी दाखविले अशोक चक्रावरील झाडूचे चित्र
आकाशवाणी चौकात सिग्नलवर डॉ. नितीन राऊत यांची गाडी थांबली असता काही तरुण त्यांच्याकडे आले व त्यांनी एका होर्डिंगवर, महापालिकेने केलेला अशोक चक्राचा अवमान दाखविला.
हेही वाचा – देशी कारागिरांना भरभरून प्रतिसाद, तब्बल दहा लाखाची विक्री
महापालिकेद्वारे आयोजित स्वच्छता दौडमध्ये मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, पोलीस उपायुक्त निमित गोयल यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला परंतु यांनी अशोक चक्राच्या झालेल्या अवमानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
दरम्यान महापालिकेने हा आरोप फेटाळून लावला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता दौड आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी अभियानाच्या माध्यमातून चित्र उपलब्ध करून देण्यात आले होते, तेच चित्र होर्डिंग्जवर दर्शवण्यात आले आहे.