केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, धोरणाविषयी अद्यापही स्पष्टता नसल्याने अंमलबजावणी मागे पडली. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शतकोत्तर महोत्सव साजरा करताना नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. या धोरणानुसार या सत्रापासून विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत बीबीएम, बीसीसीए व बी. कॉम.मध्ये नवीन धोरणानुसार अभ्यासक्रम लागू होईल.
केंद्र सरकारने जाहीर केलेले नवे शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट भूमिका शिक्षक व सरकारमध्येही नाही. मात्र, विद्यापीठाने नव्या शैक्षणिक सत्रापासून ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठाने अधिसूचना जारी करून ‘एनईपी’ लागू होणार असल्याचे जाहीर केले.
‘एनईपी’ची अंमलबजाणी करण्याबाबतचा निर्णय विद्यापीठाने ८ जुलै रोजी झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत घेतला होता. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत अभ्यास मंडळांनी ‘एनईपी’नुसार बीबीएम, बीसीसीए व बी. कॉम. या अभ्यासक्रमाच्या सत्र १ ते ६ च्या नवीन परीक्षा योजना तयार केल्या होत्या. यास २४ जूनच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाोने मान्यता दिली. यानंतर विद्यापरिषदेने ८ जुलैला झालेल्या सभेत अभ्यास मंडळाने सत्र १ व २ करिता अभ्यासक्रमिका एनईपी २०२० नुसार तयार केल्या व त्या लागू करण्यास संमती दिली. कुलपतींनी यास मान्यता दिली आहे.
नव्या बदलासह येणाऱ्या अभ्यासक्रमात व्यावसायिकतेवर जास्त भर देण्यात येणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वर्षीपासून नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. यामुळे बीबीएम, बीसीसीए व बी.कॉम. या अभ्यासक्रमासाठी नवी पुस्तके देखील येणार आहेत. मात्र, याबाबत बऱ्याच प्राध्यापकांना व शिक्षकांना माहिती नसल्याचेही समोर आले. विद्यापीठाने अचानक निर्णय घेतल्याचेही मत व्यक्त केले.