इमामवाड्यात आयोजित सभेत धार्मिक भावना दुखावणारे तसेच सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उंटखाना येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान वामन मेश्राम यांनी भाषणादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्यासह बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे प्रभारी विलास खरात आणि संयोजक-कार्याध्यक्ष बिसेन रंगारी यांच्याविरोधातही इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

उंटखान्यातील दहीपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ५ ऑक्टोबरला अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनाची परवानगी देण्यापूर्वी पोलीस विभागाने काही अटी ठेवल्या होत्या. त्या अटीची पूर्तता केल्यानंतरच या अधिवेशनाला पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यामध्ये कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध प्रक्षोभक किंवा धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य करणार नाही, या अटीचा समावेश होता. मात्र, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी जातीय तेढ निर्माण होणारे प्रक्षोभक वक्तव्य केले. या वक्तव्याची पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेऊन इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यापूर्वी ६ ऑक्टोबरला वामन मेश्राम यांनी इंदोरा चौकात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जमा होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर देशभरातून जवळपास ८ ते १० हजार पदाधिकारी-कार्यकर्ते इंदोरा चौकात गोळा झाले होते. त्यांनी संघ मुख्यालयावर मोर्चा काढून घेराव करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शहरातील वातावरण तापले होते.

हेही वाचा >>>अमरावती वादग्रस्त घोषणाबाजी प्रकरण; अनिल बोंडेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “PFI शी संबंधित…”

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना इंदोरा चौकात सभा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही सभा घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही वामन मेश्राम यांनी सभा घेऊन संघ मुख्यालयाला घेराव करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे ६ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजताच नागपूर पोलिसांनी वामन मेश्राम यांना ताब्यात घेतले होते, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur crime against vaman meshram of bharat mukti morcha amy