प्रेम त्रिकोणातून पारडीच्या भांडेवाडी परिसरात एका महिलेसह ४ आरोपींनी तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. शनिवारी उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी आता या प्रकरणात खुनासह गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमाही वाढवल्या आहेत. सर्व आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. ममता चव्हाण, अभिषेक युवराज वेलेकर, राजू ध्रुव चक्रधारी आणि तारिक युनूस शहा सर्व रा. भांडेवाडी, अशी आरोपींची नावे आहेत. निशांत प्रदीप तांबडे रा. झेंडा चौक, महाल, असे मृताचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निशांत आणि ममता यांच्यात २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २० जुलै रोजी अभिषेक, राजू आणि तारिक निशांतच्या घरी आले. सर्वांनी सोबत बसून दारू ढोसली. दारूच्या नशेत अभिषेकने त्याचे ममताशी प्रेमसंबंध असल्याचे निशांतला सांगितले. निशांतनेही त्याचे ममताशी प्रेमसंबंध असून दोघेही लग्न करणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. अभिषेकने ममताच्या घरी जाऊन तिला याबाबत विचारण्यास सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघात बळींची संख्या धक्कादायक, गडकरींनी दिला इशारा…

सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोघेही ममताच्या घरी पोहोचले. ममताने ती अभिषेकशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे निशांत चिडला. दोघांमध्ये भांडण सुरू झाले. अभिषेक आणि त्याच्या साथीदारांनी निशांतला मारहाण सुरू केली. त्याच्यावर चाकूने वार केले.

जीव वाचविण्यासाठी निशांतने तेथून पळ काढला. मात्र, पारडी चौकात आरोपींनी त्याला घेरले. पोट, छाती आणि पाठीत चाकूने भोसकून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. एका पोलिसाने मध्यस्थी करून निशांतला आरोपींच्या तावडीतून सोडवले आणि मेडिकल रुग्णालयात दाखल केले. शनिवारी २७ जुलैला निशांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमी महिलेचा मृत्यू, पती अद्यापही फरार

मंगळवारी कळमना ठाण्यांतर्गत पावणगाव परिसरात एका व्यक्तीने चारित्र्यावरील संशयातून डोके ठेचत पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. आरती रमेश तिवारी (४०) रा. देवीनगर, पारडी, असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती रमेश जगजीवनप्रसाद तिवारी (४५) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. रमेश तिवारी पूजापाठ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला तीन मुले आहेत. रमेशला संशय होता की, आरतीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. गत मंगळवारी रमेश आरतीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पावणगाव परिसरात घेऊन गेला. तेथे दगडाने तिचे डोके ठेचून रक्तबंबाळ केले आणि फरार झाला. शनिवारी दुपारी उपचारादरम्यान आरतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात खुनाची कलम वाढवून आरोपी पती रमेश तिवारीचा कसून शोध सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur crime love triangle ends in murder of ex boyfriend adk 83 zws