नागपूर : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर अशी ओळख असलेल्या उपराजधानी नागपुरात गेल्या १२ तासात दोन हत्याकांड उघडकीस आले. कुख्यात गुन्हेगारांनी दोन्ही हत्याकांड घडून आणल्यामुळे उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे. तब्बल ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या एका गुंडाने इमामवाडा परिसरात एका युवकाचा खून केला तर यशोधरानगरातील घटनेत एका गुंडाने लग्न समारंभातच एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही हत्याकांडांच्या घटनांमुळे उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
पहिल्या घटनेत, इमामवाड्यातील कुख्यात गुंड सोनू उर्फ दीपक विजय वासनिक (४४) याची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे रामबाग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर घडली. सोनू वासनिक याच्याविरुद्ध वर्धा शहरात ३० हून अधिक गुन्हे दाखल होते. ज्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी यासारखे गंभीर गुन्हे समाविष्ट आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वर्धा पोलिसांनी त्याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी तुरुंगात पाठवले होते. तुरुंगातून सुटताच जुने वैमनस्य त्याच्या मृत्यूचे कारण बनले. एक दिवस आधी तुरुंगातून सुटलेला सोनू वासनिक त्याच्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी नागपूरला रामबाग मध्ये आला होता. त्याच्या काही मित्रांसोबत बाहेर दारू पिण्यासाठी गेला. दारूच्या नशेत सोनू अनेकदा इतरांशी भांडायचा आणि या भांडखोर स्वभावच त्याच्या जीवावर घेतला.
दारूच्या नशेत सोनूचा त्याचा जुना मित्र आकाश प्रफुल्ल मेश्राम (२७) याच्याशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी झाली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यानंतर आकाश आणि त्याच्या मित्रांनी सोनूच्या डोक्यात मोठ्या दगडाने वार करून त्याची हत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. अन्य आरोपी फरार आहेत. हत्येची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुख्य आरोपी आकाश मेश्रामला अटक केली. या हत्याकांडात सहभागी असलेले त्याचे इतर साथीदार अजूनही फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
मंगल कार्यालयातच युवकाचा खून
यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवछत्रपती मंगल कार्यालयात सुरू असलेल्या भांडणात एका युवकाला मध्यस्थी करणे जीवावर बेतले. आरोपींनी एका युवकाला चाकूने भोकसून खून केला. विहांग मनीष रंगारी (२४ वर्ष, एका नाका मानव नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गुरुवारी रात्री अकरा वाजता मित्राच्या लग्न समारंभात आला होता. लग्नात आरोपी बिरजू वाढवे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे काही युवकांसोबत भांडणं सुरू होते त्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी विहान रंगारी यांनी पुढाकार घेतला मात्र आरोपी बिरजू वाढवे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विहांगवर हल्ला करीत त्याला ठार केले. हत्याकांडानंतर सर्व आरोपींनी तिथून पट काढला यशोधरा नगर पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. मात्र, अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही याप्रकरणी यशोदा नगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा नोंदविला आहे. या हत्याकांडामुळे मंगल कार्यालयात दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते.