नागपूर : तुरुंगातून सुटून आलेल्या गुन्हेगारांची मिरवणूक काढणे आणि त्याला घेण्यासाठी जीप, कार आणि अन्य वाहनांचा ताफा तुरुंगासमोर उभा ठेवणे, हे सध्या गुन्हेगारी जगतातील फॅशन झाली आहे. अशाच प्रकारे तुरुंगातून सुटल्यानंतर जीपममध्ये उभा राहून ‘इंस्टारील्स’ बनविणाऱ्या कुख्यात सुमित ठाकूरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीसुद्धा अनेक कुख्यात गुन्हेगारांनी मध्यवर्ती कारागृहासमोरुन रॅली काढून शक्तीप्रदर्शन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित ठाकूर, उजेर उर्फ उज्जी आणि इतर चार साथीदारांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये जरीपटका येथून दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना एका खोलीत डांबले. त्यानंतर त्याला दोरीने बांधून रात्रभर मारहाण केली.
नंतर, त्या युवकांना धमकी देऊन पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. या प्रकरणात सुमित आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मकोका गुन्ह्याअंतर्ग कारवाई करण्यात आली होती. जवळपास चार महिने फरार राहिलेल्या सुमितला पोलिसांनी अटक केली होती. त्याला मकोका प्रकरणात सशर्त जामीन मिळाला आहे. सुमित २ मार्च रोजी तुरुंगातून सुटणार होता. त्यामुळे सुमितच्या टोळीने आणि अन्य गुन्हेगारांनी त्याची कारागृहासमोरून ओपन जीपमध्ये रॅली काढून घरापर्यंत नेण्याचे नियोजन केले.
त्यासाठी त्यांनी फुलांनी सजवलेल्या अनेक कार आणि सुमितच्या गळ्यात मोठा हार घालून स्वागताची तयारी केली. २ मार्चला दुपारी कारागृहातून सुटणाऱ्या सुमितला घेण्यासाठी अनेक गुन्हेगार तुरुंगासमोर पोहोचले होते. सुमित कारागृहाच्या बाहेर पडताच त्याच्या गळ्यात हार घालण्यात आला. त्याला जीपमध्ये बसवून त्याच्या साथीदारांसह गाड्यांचा मोठा ताफा जरीपटक्याकडे निघाला. यादरम्यान सुमितने इंस्टाग्रामवर रिल्स बनवल्या. त्याच्या साथीदारांनी याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
रील्सच्या पार्श्वसंगीतात ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवले. ही रील समोर येताच गुन्हे शाखा सतर्क झाली. गुन्हे शाखेचे एक पथक पोहचले आणि कारवाई सुरू केली. सुमितला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम १९२, ३५३ (१), ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भविष्यात असे कृत्य पुन्हा करू नये अशी ताकिद त्याला देण्यात आली. इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओने सुमितवर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला.
राजा गौस-गजा मारणेचेही रिल्स
काही दिवसांपूर्वी कुख्यात गुन्हेगार राजा गौस याच्या भेटीला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा भेटील आला होता. त्या दोघांनी सोबत इंस्टाग्रामवर रिल्स तयार केली. ती सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.