नागपूर : दक्षिण नागपूर मतदारसंघात तिसऱ्यांदा रिंगणात असलेले भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते यांच्यासमोर काँग्रेसचे गिरीश पांडव यांचे तगडे आव्हान आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचे उमेदवार किती मते घेतात यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. असे असले तरी भाजपचे मते आणि काँग्रेसचे पांडव यांना समसमान संधी असल्याचे सध्याचे चित्र आहे.
मोहन मते आणि गिरीश पांडव यांनी प्रचारसभा, प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला. याशिवाय अनेक वस्त्यांमध्ये दुचाकीने आणि पायी फिरून मतदारांना आर्जव केला. मते यांचा भर पक्षातील मोठे नेते आणि स्टार प्रचारकावर राहिला आहे. तर पांडव यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष संपर्कावर भर दिला. गेल्या निवडणुकीतील अल्पमताने पराभव झाल्याने पांडव यांनी यावेळी चूका दुरुस्त करण्यासाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही. त्यांनी युवक आणि महिला कार्यकर्त्यांची फौज अतिशय कुशलतेने कामाला लावली.
हेही वाचा…नागपुरात अंमली पदार्थांचे तस्कर व पिस्तूल वापणाऱ्यांचा सुळसुळाट! निवडणुकीच्या तोंडावर धामधूम
मोहन मते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने आणि नासुप्रचे विश्वस्त असल्याने त्यांना काही विकास कामे दाखवण्याची संधी मिळाली. तसेच त्यांची कार्यकर्त्यांना उपलब्ध होणारा नेता म्हणून ओळख ही जमेची बाजू आहे. तर शिक्षण क्षेत्रात काम करणारे गिरीश पांडव हे काँग्रेसकडून दुसऱ्यादा लढत आहेत. त्यांनी मागील पाच वर्षे मतदारांशी संपर्क ठेवला आहे. त्यांचे मितभाषी असणे आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वादग्रस्त प्रतिमेचाही त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. येथे सुमारे १९ ते २० टक्के अनुसूचित जातीचे मतदार आहेत. मात्र,वंचित बहुजन आघाडीचे सत्यभामा लोखंडे आणि बसपच्या विश्रांती झामरे यांच्याकडून संभावित मतविभाजन रोखण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. मात्र, त्यांना ८ टक्के असलेला मुस्लीम मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच झोपडीबहुल भागांतून प्रतिसादाबद्दल त्यांना आशा आहे. या पार्श्वभूमीवर मते आणि पांडव अतिशय चुरशीची लढत होण्याची शक्यता असून अगदी एक ते दोन टक्क्याने विजयी उमेदवारांचे भवितव्य निश्चित होण्याची शक्यता दिसून येत आहे.