अनिल कांबळे
नागपूर : मुलाला चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आईवडील काबाडकष्ट करतात. नंतर धुमधडाक्यात लग्न लावून देतात. मात्र, लग्नानंतर राजा-राणीच्या संसार अपेक्षित असलेल्या सुनेला सासू-सासरे नकोसे वाटायला लागतात. यातूनच गेल्या चार महिन्यांत सुनेकडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याच्या ५०वर तक्रारी भरोसा सेलमध्ये आल्या आहेत.
राजा-राणीच्या संसाराच्या मोहापायी सून अनेकदा सासू-सासरे घरातच नको, अशी कठोर भूमिका घेते. बोटावर मोजण्याइतक्या प्रकरणात मुलगा आईवडिलांची बाजू घेतो तर उर्वरित प्रकरणात पत्नीच्या शब्दाबाहेर नसल्याचे सांगून मोकळे होताे. अशा अनेक तक्रारी भरोसा सेलमध्ये येतात. जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्यात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या जवळपास २१० तक्रारी आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी या तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी विशेष कक्ष तयार केला आहे. लेखी तक्रारीच नव्हे तर फोनवरूही तक्रारी घेतल्या जात आहेत. नातेवाईक, मुलगा, सून आणि कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करून वृद्धांना कुटुंबात पुन्हा मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य भरोसा सेल करीत आहे.
हेही वाचा >>> नागपूर : अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर खून, मृतदेह गायीच्या गोठ्यात फेकला
माहेरच्या हस्तक्षेपाने संसार धाेक्यात
उच्चशिक्षित, नोकरीवर असलेल्या आणि माहेर श्रीमंत असलेल्या सुनांविरुद्ध सर्वाधिक तक्रारी भरोसा सेलमध्ये आल्या आहेत. वृद्ध सासू-सासऱ्यांना आधार देण्यास सून अनेकदा नकार देते. माहेरच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे मुलींचा संसार बिघडत असून वादविवाद वाढत आहेत. तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्याही तक्रारी वाढत असल्याचे निरीक्षण भरोसा सेलने नोंदवले आहे.
तक्रारींचे स्वरूप
– सुनेकडून मानसिक त्रास – ५२
– मुलगा व सुनेकडून त्रास – २०
– मुले-मुली व नातेवाईकांकडून त्रास – ६३
– कौटुंबिक वाद – ३३
– शेजारी, भाडेकरूंकडून त्रास – ४७
ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येते. समुपदेशनाच्या माध्यमातून तोडगा काढला जातो. एकटे किंवा कुटुंबासह राहणाऱ्या वृद्धांनाही फोनवरून विचारपूस करण्यात येते.