नागपूर : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या समुरास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले आहेत. या हल्ल्यामुळे बॉलिवूड विश्व हादरले असून, गेल्या काही दिवसांपासून वांद्रे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याने अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणांचा तपास व त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय घडामोडींनी राज्याचे राज्याकारणही ढवळून निघाले आहे. यात सैफ अली खान प्रकरणावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर येथे कार्यक्रमानिमित्त आले असता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, ५४ वर्षीय सैफवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, गुरुवारी पहाटे वांद्रे भागातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये एका घुसखोराने हल्ला केला. त्याच्या मानेवर, पोटात आणि पाठीवर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातील चाकूचा तुकडा काढला आहे. सैफची प्रकृती सध्या चांगली असून तो लवकरच बरा होईल. डॉक्टरांनी त्याला दोन ते तीन दिवसांनी डिस्चार्ज देणार असल्याचे सांगितले. मानेवरील जखम खोल असल्याने त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रात ‘इनोव्हेशन सिटी’ निर्माण करणार, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या घराची इमारत आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चोरी करण्याच्या प्रयत्नातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पोलिसांचा तपास हा योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यांच्यावर अनेक पुरावे आहेत. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. तसेच आवश्यक त्या सर्व बाबींनी तपास सुरू आहे. लवकरच पोलीस या प्रकरणात अंतिम निकालावर जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.