नागपूरच्या दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला असून काही नागरिकांनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड केली आहे. या भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा या नागरिकांनी केली आहे. दरम्यान, याठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “विधान परिषदेत खेळाडूंऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव”, अंबादास दानवेंचा आरोप; म्हणाले, “आम्हाला…”

महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. वंजित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दीक्षाभूमी येथे कुठलीही पार्किंगची मागणी नसताना स्मारक समितीने त्याचा घाट घातला. याविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. स्मारक समितीने लोकांच्या भावनेशी खेळू नये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच आमचाही या पार्किंगला विरोध असून आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. दीक्षाभूमी हा जनतेच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर करून दीक्षाभूमीचा विकास व्हावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे? “सकाळ, दुपार संध्याकाळ जे खोटं बोलतात त्यांना…”…

देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेत निवेदन सादर

दरम्यान, या संदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले असून जनभावना लक्षात घेता, येथील बांधकामास स्थगिती देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या बांधकामाचा आराखडा स्मारक समितीने मंजूर केला असून राज्य सरकारने या बांधकामासाठी केवळ निधी दिला आहे. त्यानुसार बांधकाम सुरू आहे. मात्र, आता काही नागरिकांकडून आंदोलन सुरु आहे. तथापि लोकभावना लक्षात घेता, आता या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. असं ते म्हणाले. तसेच याप्रकरणी लवकर आंदोलक आणि स्मारक समिती यांच्या बरोबर बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur dikshamubhi underground parking issue people vandalise contruction spb