नागपूर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला राज्यात सर्वाधिक प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात असून या योजनेतून राज्यभरात ६५ हजारांवर वीज निर्मिती संच कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सौर वीज निर्मितीची क्षमता आता २६०.७५ मेगावाॅटने वाढली आहे. या योजनेमुळे ग्राहकांचे वीज देयक कमी झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती. २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यातील ६५ हजार ७६० नागरिकांच्या घरी सौर ऊर्जा निर्मिती संच कार्यान्वित झाले. या संचांमुळे राज्याची वीज निर्मिती क्षमता २६०.७५ मेगावाॅटने वाढली. या योजनेमुळे ग्राहकांच्या वीज वापरावरील देयकात मोठी घट झाली आहे. सोबतच सौर ऊर्जेचा वापर वाढल्याने कोळशावरील वीज निर्मितीवरील ताण कमी होऊन पर्यावरण संवर्धनातही मदत होत आहे.

हेही वाचा…नागपूर: अपघातग्रस्त बस, पीयूसी केंद्राची नोंदणी रद्द…’आरटीओ’कडून…

सर्वाधिक १० हजार ७७७ वीज निर्मिती संच नागपूर जिल्ह्यात कार्यान्वित झाल्याने येथील वीज निर्मिती क्षमता ४३.९३ मेगावाॅटने वाढली आहे. त्यात शहरी भागातील ९ हजार ५१८ संच (३९.०७ मेगावाॅट), ग्रामीण भागातील १ हजार २५९ संचांचा (४.८६ मेगावाॅट) समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात ५ हजार १७९ संच कार्यान्वित झाल्याने येथील वीज निर्मिती क्षमता १९.३५ मेगावाॅट, अमरावती जिल्ह्यात ४ हजार ४३ संच कार्यान्वित झाल्याने येथील क्षमता १७.२६ मेगावाॅट, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ हजार ८१२ संच कार्यान्वित झाल्याने येथील क्षमता १७.८४ मेगावाॅट, नाशिक जिल्ह्यात ४ हजार ३९७ संच कार्यान्वित झाल्याने येथील क्षमता १५.९४ मेगावाॅटने वाढली आहे.

“शासन व महावितरणच्या सूक्ष्म नियोजनातून राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेला आणखी गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

हेही वाचा…सावधान ! सरकारी पाहुणे येत आहेत, सरबराईच्या तयारीला लागा …

प्रकल्पातून किती वीज तयार होते?

एक किलोवाॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवाॅट क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवाॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur district has highest response to pradhan mantri suryaghar yojana with 65000 sets commissioned mnb 82 sud 02