नागपूर : भारतीय सैन्य दलातील काही जवान रेल्वे परिसरात बंदोबस्तासाठी गेल्या तीन महिन्यांपूर्वी नागपुरात आले. त्यापैकी तीन जवान सोमवारी रात्री अकरा वाजता गंगाजमुनामध्ये मौजमजा करायला आले. गंजाजमुना वस्तीत अफसाना नावाच्या वारांगणेने त्यांना सुंदर मुलगी दाखविण्याचे आमिष दिले. तिघांनीही होकार दिला आणि सौदा पक्का झाला. दोघे अन्य खोलीत गेले तर एक जवान अफसानाच्या खोलीत गेला. त्यांच्या भाषेवरुन तीनही जवान पंजाब-हरियाणा राज्यातील असल्याचे अफसानाने हेरले. तिने कैकाडे नावाच्या गुंडाला बोलावले. काही वेळातच कैकाडे अफसानाच्या खोलीत शिरला. त्याने जवानाला चाकू दाखवला आणि पैसे, मोबाईल, घड्याळ हिसकावून घेतले. जवानाला कैकाडेने शिवीगाळ केली. त्यामुळे तो चिडला. त्याने कैकाडेला चांगला चोप दिला. अफसाना मध्ये आली असता तिच्याही कानशिलात मारली. गोंधळ उडताच एक पोलीस कर्मचारी तेथे आला. त्याने अफसानाची बाजू घेतल्यामुळे चिडलेल्या जवानाने त्या पोलीस कर्मचाऱ्यालाही चोपले. ‘ या घटनेनंतर काही वेळातच डीबी पथक तेथे पोहचले. जवानाला ताब्यात घेतले. यादरम्यान, अन्य दोन जवान गंजाजमुनातून पळून गेले. त्या जवानाला पोलीस ठाण्यात आणले आणि स्टेशन डायरीवर नोंद घेतली. पुढील कारवाई करण्याची तजविज ठेवली,’ अशी माहिती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
अफसाना नावाच्या वारांगणेने हा डाव खेळला. जवानांना आधी सुंदर तरुणींचे आमिष दाखवले. तिघांमध्ये सौदा झाला. एका जवानाला रुममध्ये नेल्यानंतर लपून बसलेला कैकाडे नावाच्या गुंडाने जवानाला चाकू दाखवला आणि पैसे हिसकावून घेतले.
मारहाणीचा ‘व्हिडीओ व्हायरल’
गंजाजमुनात पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे पीएसआय संदीप शिंदे यांच्या पथकानेही जवानाला जबर मारहाण केली. शिवीगाळ करीत जवानाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यात आणले. या घटनेचा ‘व्हिडीओ सोशल मीडिया’वर चांगलाच ‘व्हायरल’ झाला. त्या जवानाच्या नावाने स्टेशन डायरीवर नोंद केली. दरम्यान, अन्य दोनही जवान पोलीस ठाण्यात पोहचले. वरिष्ठांपर्यंत प्रकरण पोहचल्यामुळे तडजोड झाल्याची चर्चा आहे.
गंगाजमुनात गुन्हेगारांचा मुक्त वावर
गेल्या काही दिवसांपूर्वी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी गंगाजमुनात आंबटशौकीन ग्राहकांची लूट सुरु केली होती. या प्रकरणी ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करताच चारही कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली होती. आता पुन्हा तोच प्रकार सुरु झाल्याचे समोर आले आहे. गंजाजमुनात गुन्हेगारांचा मुक्त वावर असून वारांगणासुद्धा गुन्हेगारीत सक्रिय झाल्या आहेत. शहरातील गुन्हेगारांवर धडाक्यात कारवाई सुरु असताना कैकाडे मात्र, त्यातून सुटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या कार्यकाळातील ही दुसरी घटना असल्याचे बोलले जाते.