नागपूर: प्रयागराज येथील महाकुंभ मेळात आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत अनेकांनी प्राण गमावल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर, बल्लारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम, बैतूल आणि पांढुर्णा यासारख्या प्रमुख स्थानकांवर हेल्पाईन सुरू केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी कुलींची नेमणूक करून त्यांना मोफत सामान नेण्याची सुविधा देण्यात आली आहे.
महाकुंभ मेळासाठी देशाच्या वेगवेगळ्या भारतातून प्रयागराजकडे भाविक जात आहेत. त्यामुळे रेल्वे उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांसाठी अनेक रेल्वे स्थानकावर काही उपाययोजना केल्या आहेत.ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी विशेष मदत करण्यात येत आहे. कुलींची नेमणूक करून त्यांना मोफत सामान नेण्याची सुविधा देण्यात आली, जेणेकरून प्रवासी त्यांच्या आसनांपर्यंत सहज पोहोचू शकतील.
उत्तर दिशेकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी सुरळीत नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांना योग्य सुविधा देण्यासाठी, मध्य रेल्वे नागपूर विभागाने नागपूर रेल्वे स्थानक तसेच बल्लारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम, बैतूल आणि पांढुर्णा यांसारख्या प्रमुख स्थानकांवर महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत.तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती: प्रवाशांना त्यांच्या निर्धारित प्लॅटफॉर्मवर सुरक्षित पोहोचवण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी समर्पित तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले.
– विशेष गाड्यांसाठी नियमित घोषणा: या गाड्यांची माहिती प्रणालीमध्ये पूर्वनिर्धारित नसल्यामुळे, प्रवाशांना आवश्यक माहिती देण्यासाठी सतत घोषणा करण्यात आल्या.
– आरपीएफ आणि तपासणी कर्मचाऱ्यांचा सहभाग: रेल्वे सुरक्षा दल आणि तपासणी कर्मचारी यांनी विशेष मदत पुरवून प्रवाशांना त्यांच्या आसनांपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवले.
– ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी विशेष मदत: कुलींची नेमणूक करून त्यांना मोफत सामान नेण्याची सुविधा देण्यात आली, जेणेकरून प्रवासी त्यांच्या आसनांपर्यंत सहज पोहोचू शकतील.
१४४ वर्षांनी ‘महायोग’
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ आहे. साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये गोळा झाले आहेत.प्रयागराज येथे दर १२ वर्षांनी महाकुंभ होत असला, तरी यंदाचा महाकुंभ विशेष असल्याचे साधुसंतांचे म्हणणे आहे. सध्याची ग्रहस्थिती ही सर्वांत पवित्र असून १४४ वर्षांनंतर असा योग आल्याचे सांगितले जात आहे. या काळात प्रयागराज येथे केलेल्या कोणत्याही यज्ञाचा प्रभावही अधिक असेल, असा दावा काही साधुसंतांनी केला आहे. यंदाच्या महाकुंभमुळे राष्ट्राला आणि भाविकांना अधिक ऊर्जा मिळेल, असे गोवर्धन मठाचे पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ यांनी म्हटले आहे.