१३ सदस्यांना मात्र घरचा रस्ता
जनतेचे प्रश्न महापालिकेच्या सभागृहात मांडून त्यांचे निराकरण करणे, हे नगरसेवकांचे कर्तव्य ठरते. मात्र, एकदा निवडून गेल्यावर लोकांशी आपले काही देणे-घेणे नाही, अशा तोऱ्यात गेल्या पाच वर्षांत आपल्या भागातील समस्यांबाबत सभागृहात ‘मौनीबाबां’ची भूमिका वठविणाऱ्या तब्बल ८७ पैकी २१ नगरसेवकांनी महापालिकेत पुन्हा प्रवेश केला आहे. यात सर्वपक्षीय दिग्गजांचा समावेश आहे.
नगरसेवकांना त्यांच्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविली जाते. प्रशासनाकडून त्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याचा उहापोह या सभेत होत असतो. मात्र, अनेकदा नगरसेवक या संधीचा लाभच उठवित नाहीत. सभेला उपस्थिती नोंदवून आपला ‘भत्ता’ सुरक्षित ठेवणारे नगरसेवक सभागृहात मात्र जनप्रश्नांवर बोलतच नाहीत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष या पदांवर असताना बोलण्याची संधी मिळत नाही, पण अन्य वेळी नगरसेवक म्हणून त्यांना आपापल्या वस्त्यांमधील समस्या मांडण्याची संधी असते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून प्राप्त केलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१२ ते ३० एपिल २०१६ या कालावधीत झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये ८७ सदस्यांनी सभागृहात एकही लेखी प्रश्न मांडलेला नाही. यात विविध पक्षातील अनेक ज्येष्ठ सदस्यांचाही समावेश होता. त्यातील काही विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा निवडणूक लढवून त्यातील २१ सदस्यांनी महापालिकेत पुनप्र्रवेश केला आहे, तर १३ विद्यमान सदस्यांना मतदारांनी घरी बसविले आहे.
उर्वरित ५३ सदस्यांना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. काहींनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक सर्वसाधारण किंवा विशेष सभेची कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते. त्यात नगरसेवकांकडून प्रश्न मागविले जातात किंवा ते स्वत:ही देऊ शकतात. त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, अनेक सदस्य सभागृहात प्रश्न उपस्थित न करता केवळ मौन पाळतात. यावेळी पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांमधून किती यापुढेही ‘मौनीबाबां’ असतील, हे येणारा काळ ठरविणार आहे.
निवडणुकीत पराभूत झालेले सदस्य
भाजपच्या नीता ठाकरे, साधना बरडे, जैतुनबी अशफाक आणि रमेश सिंगारे, विशाखा मैंद, बसपाचे अभिषेक शंभरकर, सत्यभामा लोखंडे, हर्षला जयस्वाल, भारिपचे राजू लोखंडे, मनसेचे श्रावण खापेकर, अपक्ष रवींद्र डोळस आणि भाजपमधून शिवसेनेत गेलेले अनिल धावडे.
सभागृहातील मौनीबाबा
भाजपच्या सुषमा चौधरी, भाग्यश्री कानतोडे, संगीता गिऱ्हे, माजी उपमहापौर संदीप जाधव, माजी महापौर माया इवनाते, परिवहन समितीचे विद्यमान सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, सरिता कावरे, गोपीचंद कुमरे, चेतना टांक, विद्या कान्हेरे, मनीषा कोठे, दिव्या धुरडे, नासुप्रचे माजी विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर, रिता मुळे, स्वाती आखतकर, जयश्री वाडिभस्मे, पल्लवी शामकुळे, तर काँग्रेसच्या उज्ज्वला बनकर, पुरुषोत्तम हजारे आणि राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे.