महिलांचा मोठा सहभाग, प्रश्नांवर मैन
निवडणुका विधानसभेच्या असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, महिला मतदारांची मते गृहीत धरून उमेदवार चालत असले तरीही त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांविषयी खूप काही असते असे नाही. सर्वच उमेदवारांचा भर स्थानिक समस्यांवर असला तरीही महिलांच्याही वेगळ्या समस्या असू शकतात, हे कोणताही उमेदवार लक्षातच घेत नाही. प्रचारात मात्र उमेदवार अधिकाधिक संख्येने महिलांना सामावून घेतात. दारोदारी मतांची भीक मागण्यासाठी महिला सामोरे गेल्या तर मतदार राजाचा रोष असेल तर तो कमी होईल, ही देखील त्यामागची भूमिका असते. प्रत्यक्षात महिलांच्या प्रश्नांवर उमेदवार फार बोलतच नसल्याचे चित्र आज ठिकठिकाणी फिरताना दिसून आले.
नोव्हेंबर २०१२ मध्ये नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील कुख्यात गुंड इक्बाल याला लोकांनी दगडानी ठेचून ठार केले होते. इक्बालचा भाऊ भुरू याला न्यायालयात आणले तेव्हा त्याला ताब्यात देण्याची मागणी करत झोपडपट्टीवासीयांनी न्यायालय परिसरात तोडफोड केली होती. या गुडांनी झोपडपट्टीतील मुलींपासून तर महिलांना आपले भक्ष्य केल्याने अनेक वर्षांनंतर का होईना या संतापाचा स्फोट झाला आणि त्या गुंडांना मारले गेले. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली होती की शहरातीलच नव्हे तर शहरातील झोपडपट्टीतही महिला सुरक्षित नाही. त्यानंतर होणारी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. या पाश्र्वभूमीवर इथल्या महिलांशी संवाद साधला तेव्हा महिलांच्या सुरक्षेवरून स्थानिक प्रशासनावरचा त्यांचा विश्वास उडाल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आढळून आली. मात्र, निवडणुका आहेत आणि मतदान करायचेच आहे, ही एक भावना या दोन्ही ठिकाणच्या महिलांमध्ये दिसून आली.
निवडणुकांमध्ये हा प्रकार चालतच असतो. उमेदवारांच्या प्रचारादरम्यान महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते हे अगदी खरे आहे. प्रचारात तो मुद्दाही नसतो, पण जे मुद्दे उमेदवार प्रचारादरम्यान त्यांचे मुद्दे मांडतात, आश्वासन देतात, ते कुठे पूर्ण केले जातात? म्हणून मतदानाकडे पाठ फिरवून चालणार नाही. मतदान तर करायचेच आहे. उमेदवार दारासमोर येतो तेव्हा ‘अतिथी देवो भव्’ या उक्तीप्रमाणे आम्ही हसूनच त्याचे स्वागत करतो.
–प्रज्ञा देवगडे, धरमपेठ
निवडणुकीत सारेच दारावर येतात. दारासमोर उभे राहतात, हात जोडतात आणि म्हणतात ‘एक मत नक्की द्या’ असे बोलून निघून जातात. दुसरा येतो आणि झोपडपट्टी सुधारण्याचे वचन देतो. मात्र एकही जण आमच्या समस्यांविषयी बोलत नाही. ‘अब चार वोट देना है भाई, चार को एकएक दे देंगे. मेरे एक वोट से तो कोई जितने वाला नही है’ उमेदवार येतात तेव्हा आम्ही कधीच समोर जात नाही. आम्ही उमेदवारांशी बोलतही नाही. आमच्या घरचीच माणसे समोर जातात, पण दाराआडून काय गोष्टी होतात हे आम्हाला ऐकायला मिळते.
– छाया यादव, वसंतराव नाईक झोपडपट्टी
आम्ही मतदान करून आपले कर्तव्य बजावतो, पण महाविद्यालयापासून तर घर या प्रवासादरम्यान कितीतरी आव्हाने समोर असतात. आम्हा महाविद्यालयीन मुलींच्या प्रश्नांवर तर एक चक्कार शब्द उमेदवारांच्या तोंडून ऐकायला मिळत नाही. निवडणुकीबाबत जाहिरात करताना, मतदान करणे आवश्यक आहे हे सांगताना मात्र आमच्यासारखी महाविद्यालयीन तरुणाईचे चेहरे वापरले जातात. निवडणुकांमध्ये तरुणाई उमेदवार म्हणून सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशावेळी त्यांनी तरी समवयस्कांचे प्रश्न प्राधान्याने घ्यायला हवेत.
– सायली ठाकरे, विद्यार्थिनी