नागपूर : एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून २ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. प्रशांत मारुती भाजीपाले (५२) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. प्रशांत भाजीपाले हा महावितरणच्या बिनाकी विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग १) म्हणून कार्यरत आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून लाच घेऊन काम करीत होता.
हेही वाचा : अमरावती : भाजपमध्ये प्रवेश करताच राजेश वानखडेंवर लोकसभा संयोजकपदाची जबाबदारी
कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक रिलायन्स कंपनीच्या टॉवर मीटरवर विजेचा अतिरिक्त भार वाढवून घ्यायचे असल्याने एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने आरोपी प्रशांत भाजीपाले यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी या कामासाठी ८ हजार रुपये मागितले. त्याने लगेच ८ हजार रुपये घेतले आणि आणखी २ हजार रुपये मागत होता.
याची तक्रार कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. आरोपीने लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. आज दुपारी मेहंदीबाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपीने तक्रारदाराकडून २ हजार रुपये स्वीकारताच पथकाने पकडले. त्याच्या विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक मधूकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप जगताप, निरीक्षक युनूस शेख व नितीन बलिंगवार, भागवत वानखेडे, महेश सेलेकर, सचिन किन्हीकर, कांचन गुलबासे, शरिक अहमद यांनी ही कारवाई केली.