आधुनिकतेसह पारंपरिक शेती करण्याचे आवाहन
जमिनीचा छोटा हिस्सा असणारे भारतातील ६५ टक्के शेतकरी यांत्रिकी शेतीच्या मोहात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारतातील छोट्या शेतीचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना आधुनिकतेच्या जोडीने पारंपरिक शेतीचा मार्गही शिकवायला हवा, असे डॉ. भागवत म्हणाले.

राष्ट्रीय पशुवैद्यकीय विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी झालेल्या बाराव्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. मोहन भागवत यांना राष्ट्रीय पशुवैद्यकीय विज्ञान संस्था नवी दिल्लीच्यावतीने मानद अधिछात्रवृत्तीने सन्मानित करण्यात आले.
डॉ. भागवत म्हणाले, शेती आणि पशुपालनावर आधारित संशोधन इंग्रजीत असल्याने ते शेतकऱ्यांना समजण्यास कठीण जाते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रादेशिक भाषेला महत्त्व देण्यात आल्याने यापुढे शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषेत हे साहित्य उपलब्ध झाल्यास त्यांना त्याचा लाभ होईल. कृषी आणि पशुपालनाच्या भरवशावर भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये वाढ करता येईल.

Story img Loader