यवतमाळ : जिल्ह्यात २०२३ मध्ये अतिवृष्टीने ११० महसूल मंडळातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत न करता ज्यांचे नुकसान झाले नाही अशा शेतकऱ्यांना विमा मोबदला देऊन मदत केली. हा प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर सांख्यिकी विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रविवारी या प्रकरणात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात मे. रिलायन्स जनरल विमा कंपनी मुंबई यांच्या सीईओंसह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीईओ राकेश जैन (४८), प्रमुख शासकीय व्यवसाय अधिकारी प्रकाश थॉमस (४०), उपाध्यक्ष शासकीय व्यवसाय रिजवान मोहम्मद कॅभवी (४८), जोखीम राज्य व्यवस्थापक विजय मोरे (४०), राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील (२८), जोखीम जिल्हा विमा योजना व्यवस्थापक स्वप्नील घुले (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांवर पीक नुकसानीच्या सर्हेक्षणात अनियमितता करून शासन आणि प्रशासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा…आनंदवार्ता! ‘या’मार्गावर नवीन रेल्वे धावणार; मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना…

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना मदत मिळणे अपेक्षित असताना विमा कंपनीने अफरातफर केल्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळालीच नाही, उलट ज्याच्या शेतात पीक नव्हते, अशा शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यात आला. त्यावेळी हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तेव्हा पिकांच्या नुकसानीचे वेळेत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता रिलायन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरले. त्यामुळे शेतकरीवर्गात संताप व्यक्त होऊ लागला. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावरून चौकशी सुरू करण्यात आली. यातून हा फसवणुकीचा प्रकार पुढे आले.

विशेष म्हणजे, पीक विमा कंपनीने कृषी विभागाला चौकशीत कोणतेच सहकार्य केले नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अतिशय कमी रक्कम टाकून एकप्रकारे त्यांची थट्टा केली. यायामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी कृषी उपसंचालक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पीक आढळून आले नाही. मात्र विमा कंपनीने अशा शेतकऱ्यांनाही पीक नुकसानीचा लाभ दिला, हे स्पष्ट झाले.

हे ही वाचा…एसटी महामंडळात ११ हजार कोटींचा गैरव्यवहाराचा संशय… ७० हजार कोटींच्या करारावर…

दुसरीकडे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची शेतकऱ्यांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही. काही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत दिली. या सर्व अफरातफर प्रकरणाची कृषी विभागाच्या सांखयिकी शाखेने पडताळणी केली. या शाखेचे तंत्र अधिकारीप्रदीप वाहाने यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून या प्रकरणात फसवणुकीसह संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकाराने जिल्ह्यात पीक विमा वितरण करताना कपंनी घोळ करत असल्याची ओरड खरी होती, यावर शिक्कामोर्तब झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur farmers in 110 revenue circles not getting proper insurance compensation statistics department inquired nrp 78 sud 02