नागपूर : मेडिकल चौकातील व्ही.आर. मॉलमधील पॅन्टालून्स स्टोअरच्या ‘ट्रायल रूम’मध्ये १६ वर्षाची मुलगी कपडे बदलण्यासाठी गेली असता अचानक एक कर्मचारी आतमध्ये शिरला. यावेळी मुलीने विरोध केला, पण तिच्या विरोधाला न जुमानता तो तेथेच थांबला. शेवटी तिने आईवडिलांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सुनील राऊत असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी ही मंगळवारी तिच्या आईवडिलांसोबत मेडिकल चौकातील कपड्याच्या आउटलेटमध्ये गेली. तेथे कपडे नीट फिटिंगला बसते का म्हणून
‘ट्रायल रूम’मध्ये गेली. या दरम्यान एक पुरुष कर्मचारी तेथे शिरला. मुलीने त्याला हटकले. मात्र, तो तेथेच उभा होता. ग्राहकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम असल्याचे सांगून त्याने तेथून जाण्यास नकार दिली. या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी आऊटलेटच्या व्यवस्थापकांकडे त्या कर्मचाऱ्याची तक्रार केली. त्यानेही कर्मचाऱ्याला ओरडण्याऐवजी त्याच्या कृतीचे समर्थन केले. त्यामुळे चिडलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीवर राग व्यक्त केला. आउटलेटमध्ये किंवा महिलांच्या ‘ट्रायल रूम’जवळ महिला कर्मचारी का ठेवली नाही, असा जाब विचारला. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी इमामवाडा पोलिसांशी संपर्क साधला. आरोपी सुनील राऊतविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सुनील राऊत नावाच्या कर्मचाऱ्याने १६ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केले. त्या मुलीने पालकाना हा प्रकार सांगितला. पालकांनी त्या कर्मचाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आरोपी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. पुढील तपास इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश ताले करीत आहेत.
हेही वाचा – अकोला : मंत्रिपदाची संधी हुकली, मात्र पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
महिलांची सुरक्षा ऐरणीवर
गेल्या ११ महिन्यांत शहरातील महिला व तरुणींसह अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, विनयभंग आणि लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गृहमंत्र्याच्या शहरात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात वाढ होणे, याबाबत पोलिसांना कोणतेही गांभीर्य नाही. अनेकदा पोलीस तक्रारकर्त्यांना बदनामीची भीती दाखवून तक्रार न नोंदवता आल्यापावली परत पाठवतात. तसेच महिला पोलीस अधिकारीसुद्धा लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा तपास गांभीर्याने करीत नाहीत. त्यामुळे न्यायालयातूने अनेक आरोपी निर्दोष सुटतात. शहरात महिला सुरक्षेबाबत पोलीस गंभीर नाहीत. अशाप्रकारे घटना दिवसेंदिवस समोर येत असल्यामुळे शहरातील महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.