नागपूर : सदर परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून तेथे उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, आता उड्डाणपुलावरून शहराबाहेर जाणारी वाहने सुसाट जाताहेत. मात्र, पुलाखालील लिबर्टी टॉकिज चौक-गुरुगोविंद सिंह चौकातील वाहतुकीची कोंडी मात्र कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सदर उड्डाणपुलाचा फायदा काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
रिझर्व्ह बँक चौकापासून सुरू होणारा उड्डाणपूल सदर परिसरातून थेट काटोल नाका चौकापर्यंत जातो. सदरमधील वाहनांची गर्दी कमी व्हावी, हाच उद्देश हा पूल बांधण्यामागे होता. मात्र, सदरमध्ये दिवसेंदिवस हॉटेल, शाळा आणि अन्य आस्थापनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पुलावरून मोठी वाहने जातात. मात्र पूल लांब असल्याने अनेक जण पुलाखालील रस्त्याचाच पर्याय निवडतात. काटोल रोड चौकाकडे जायचे असले तरी अनेक वाहनचालक उड्डाणपुलाचा वापर करीत नाहीत. या परिसरात वाहतूक कोंडी होत असूनही वाहतूक पोलीस उड्डाणपुलाच्या दोन कोपऱ्यावरच उभे असतात. सदरमध्ये मंगळवारी बाजार असल्यामुळे वाहनांची गर्दी वाढते.
हेही वाचा – अंबरनाथकरांना एक दिवसाआड पाणी, बदलापुरातही दोन दिवस टंचाईचे
सदर परिसरात नामांकित शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे लिबर्टी चौकातून स्कूल बसेसची मोठी गर्दी असते. यासोबतच काटोल किंवा कामठीकडे जाणाऱ्या एसटी बसेसही याच मार्गावरून धावतात. तसेच शहर बसच्या सर्वाधिक फेऱ्या सदर मार्गार आहेत. बरेचदा ही वाहने उड्डाणपुलाऐवजी पुलाखालील मार्गाचा वापर करतात. त्यामुळेही कोंडी होते.
खासगी बसेस आणि एसटी बसेसची गर्दी
सदर परीसरात नामांकित शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅन मोठ्या प्रमाणात लिबर्टी चौकातून जातात. यासोबतच काटोल किंवा कामठीकडे जाण्यासाठी एसटी बसेसही मोठ्या प्रमाणात या मार्गावरून धावतात. तसेच आपली बसच्या सर्वाधिक फेऱ्या सदर मार्गावरून आहेत. मोठ्या वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे बरेचदा वाहतूक कोंडी होते.
सिग्नल कायमस्वरुपी बंद
लिबर्टी-गुरुगोविंदसिंह चौकात वाहतूक सिग्नल नेहमी बंद असतात. त्यामुळे लवकर पोहचण्याच्या नादात अनेक वाहने उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करतात. मात्र, या रस्त्यावर हातठेले, अतिक्रमणामुळे वाहने अडकतात. तसेच कार वापरणारे नागरिक सदरमध्ये जास्त आहेत. हेसुद्धा वाहतूक कोंडीचे एक कारण आहे.
खाद्यपदार्थांची दुकाने रस्त्यावरच
सदरमध्ये खाद्यपदार्थांची शेकडो दुकाने रस्त्यावर आहेत. त्यामुळे ग्राहकांची वाहनेही रस्त्यावरच असतात. परिसरातील अनेक दुकानदारांच्या दुचाकीसुद्धा पदपथावर असतात.
हेही वाचा – पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या संशोधकांकडून फसवणूक! नियम डावलून तासिका तत्त्वांवर सेवेत
नागरिक काय म्हणतात?
सदरमधील वाहतूक कोंडीमुळे नाकीनऊ येतात. कारचालकांची एवढी संख्या आहे की दुचाकीनेसुद्धा घराबाहेर पडावे वाटत नाही. रस्त्यावरील अतिक्रमण या वाहतूक कोंडीत आणखी भर घालते. वाहतूक पोलिसांनी यावर उपाय शोधावा. – देवेंद्र बागल, परिसरातील नागरिक.
पोलीस काय म्हणतात?
उड्डाणपुलामुळे सदरमधील वाहतूक काही प्रमाणात नियंत्रित झाली आहे. मात्र, सदरमध्ये मुख्य बाजार असल्यामुळे वाहनांची संख्या जास्त आहे. उड्डाणपुलाचा योग्य वापर झाल्यास पुलाखाली वाहनांची संख्या कमी होईल. – प्रशांत अन्नछत्रे, पोलीस निरीक्षक, सदर वाहतूक विभाग.