नागपूर : भाजपमध्ये पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या काही निष्ठावंत समर्थकांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करत त्याचा मी सुद्धा एक बळी असल्याचा दावा भाजपमधून नुकतेच निलंबित करण्यात आलेले माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी हरेड्डी यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. नितीन ग़डकरी यांनी तळागळातील ग्रामीण व शहरातील अनेक कार्यकर्त्याना पक्षात आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली १९९६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने मला आमदार म्हणून संधी दिली. गडकरी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो. मात्र गेल्या काही दिवसात गडकरी यांच्या निष्ठावंत समर्थकांना पक्षातील काही नेत्यांकडून डावलले जात आहे. त्यात गिरीश व्यास, अनिल सोले, दयशंकर तिवारी यांचा समावेश असल्याचे रेड्डी म्हणाले. गडकरी यांच्यावर आमची निष्ठा आहे त्यामुळे पक्षाने जरी मला निलंबित केले असले तरी कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
शिंदेंच्या दबावामुळे निलंबन
हे ही वाचा…‘आनंदाचा शिधा’ आता फोटोविना; शिधापत्रिकाधारकांना…
आमदार आशिष जयस्वाल यांच्या विरोधात मी भूमिका घेतली तर माझ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली येऊन पक्षाने माझ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षातील नेत्यांना स्वत:चे मत नाही आणि त्यांनी मला माझे मत मांडण्याची संधी दिली नाही. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यात काय चुकीचे केले आहे. मी जर चुकीचे वक्तव्य केले असेल तर मला पक्ष नेतृत्वाकडून कारणे दाखवा नोटीस देणे किंवा मला बोलवून माझे मत मांडण्याची संधी देणे अपेक्षित होते मात्र ते न करता निलंबनाचे पत्र पाठवले. याबाबत मी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा,संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझ्या निलंबनाचा पुर्नविचार करावा अशी मागणी केली आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नसून अजुनही आजही भाजपचा कार्यकर्ता आणि राहणार असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
शिंदे अपघाताने मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिदे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहे. माझी विकासासंबंधी काही कामे त्यांच्याकडे घेऊन गेलो, ती केली जात नव्हती मात्र आशिष जयस्वाल यांच्या विकास कामाच्या फाईलवर ते स्वाक्षरी करत होते. असा भेदभाव भाजपमध्ये कधी करण्यात आला नाही. निलंबनाची कारवाई केल्यानंतर मला अजुनही कुठल्याही पक्षांकडून विचारणा करण्यात आली नाही आणि केली तरी मी जाणार नाही. माझ्या निलंबनावर पक्षाने पुनर्विचार करावा यासाठी आणखी काही दिवस वाट बघणार आहे आणि २८ ऑक्टोबरला मी माझा निर्णय जाहीर करणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.