नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आलेली असून सामाजिक न्याय विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात शहरातील मागासवर्गीय मुला/मुलींची एकूण १४ वसतिगृहे तसेच तालुका स्तरावदरील मागासवर्गीय मुला/मुलींचे एकूण ११ शासकीय वसतिगृह उमरेड, कुही (मुलांचे), कुही (मुलींचे), वानाडोंगरी (मुलांचे), वानाडोंगरी (मुलींचे), नांदा ता. कामठी (मुलांचे), पारशिवनी (मुलांचे), काटोल (मुर्लीचे), रामटेक (मुलींचे), कळमेश्वर (मुलींचे), सावनेर (मुलींचे) अशा एकूण २५ शासकीय वसतिगृहांसाठी सन २०२४- २५ या शैक्षणिक सत्राकरिता शालेय अभ्यासक्रमाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.
यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, मांग/मेहतर, भंगी, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या सद्य:स्थितीत इयत्ता आठवी व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह अंथरूण- पांघरूण, शैक्षणिक साहित्य, पुस्तके, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम, ई-लायब्ररी व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. सन २०२४-२५ या सत्रातील शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील रिक्त जागेसाठी वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा गरजू विद्यार्थ्यांनी नागपूर शहरातील सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलींचे ६ शासकीय वसतिगृहे व मुलांचे ८ शासकीय वसतिगृहांत प्रवेशासाठी शहाराच्या केंद्रभागी असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वसंतनगर, चोखामेळा परिसर, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथून विनामूल्य अर्ज प्राप्त करून निर्धारित मुदतीत संपूर्ण आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. तसेच वसतिगृह प्रवेश अर्ज खालीलप्रमाणे दिलेल्या क्यूआर कोड वरून देखील उपलब्ध करून घेऊन आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृहात सादर करू शकता.
हेही वाचा – ओबीसीतील कोणती जात दुरावली? भाजपचे बुथनिहाय सर्वेक्षण सुरू
हेही वाचा – समाज कल्याण विभागाच्या आयुक्ताची सुनावणीला विनाकारण दांडी, न्यायालयाने फटकारले
तसेच ग्रामीण भागातील तालुका स्तरावरील ११ वसतिगृहांत प्रवेशासाठी संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सादर करावेत, असे जाहीर आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यानी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर या कार्यालयाशी संपर्क करावा.