नागपूर : काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होऊन या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. बचाव आणि मदत कार्याबाबत मी प्रशासनाच्या संपर्कात राहून माहिती घेत आहे. या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यांना प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जात आहे असे त्यांनी सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे. जखमी कामगारांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दुपारपर्यंत नागपुरात होते. त्यांनी नागपूर सोडल्यानंतर ही दुर्घटना घडली. यापूर्वी नागपूर लगतच्या सोलार कंपनीत अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हा कंपनीतर्फे मृत कामगारांना पंचवीस लाख रुपये मदत करण्यात आली होती. त्याच धर्तीवर या कामगारांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे.