नागपूर : राज्यात सध्या अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात होत असून मुंबईनंतर नागपुरातच सर्वाधिक अंमली पदार्थांची तस्करी झाली आहे. गेल्या नऊ महिन्यात मुंबईत ३२ कोटींपेक्षा जास्त एमडी ड्रग्स तर नागपुरात चार कोटी ३१ लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन प्राप्त झाली.

राज्यात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढली असून शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. राज्यात अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी (एमडी, ब्रॉऊन शुगर, हेरॉईन, चरस, कोकेन) विक्रींमध्ये वाढ झाली आहे. राज्यात मोठमोठ्या शहरात पब आणि हुक्का पार्लरसह काही बार अँड रेस्ट्रॉरेंटमध्ये अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. अंमली पदार्थ विक्रीवर अंकुश लागावा यासाठी पोलीस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात नॉर्को कॉर्प नावाने पथक स्थापन करण्यात आले तर प्रत्येक आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयात अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) पथक कार्यरत आहे. मात्र, नॉर्को कॉर्प पथकाने सुरुवातील कारवाईचा धडाका लावला होता. मात्र, आता तस्करांसोबत ‘अर्थपूर्ण’ संबंध निर्माण झाल्याने हे पथक ‘पांढरा हत्ती’ ठरत आहेत.

आणखी वाचा-वरती मेट्रो, खाली रेल्वे, मध्ये रस्ता अन् आणखी बरेच काही…देशातील पहिला उड्डाणपूल

ड्रग्स तस्करीला राजकीय पाठबळ आणि पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. पब आणि हुक्का पार्लरमध्ये तरुण-तरुणींनी अगदी सहजरित्या एमडी पावडर मिळत असल्यामुळे पब-हुक्का पार्लरकडे जाणाऱ्या युवा वर्गाचा टक्का वाढला आहे. नागपुरात गेल्या नऊ महिन्यांत अंमली पदार्थांच्या १९६ कारवाईंमध्ये २५९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ कोटी ३१ लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले. तर मुंबईत ३२ कोटींपेक्षा जास्त एमडी नावाचे अंमली पदार्थ जप्त केले असून एक हजारांवर तस्कर, विक्रेते आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विक्री आणि तस्करीत राज्यात नागपूर दुसऱ्या स्थानावर, पुणे तिसऱ्या स्थानावर तर पहिल्या स्थानावर मुंबई कायम आहे.

आणखी वाचा-अमरावती: शिक्षिकांचा अभाव, अल्‍पवयीन मुलींच्या समुपदेशनात अडथळे

तस्करांचे दिल्ली-उत्तरप्रदेश ‘कनेक्शन’

देशात अंमली पदार्थ तस्करीचे पूर्वी मुंबई-गोवा असे ‘कनेक्शन’ होते. मात्र, आता एमडी तस्करीचे दिल्ली-उत्तरप्रदेश नवे ‘कनेक्शन’ आहे. या दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभर अंमली पदार्थ पोहचतात. तस्करांनी दिल्ली आणि उत्तरप्रदेशात एमडी नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी प्रयोगशाळा तयार केल्या आहेत. नायजेरियातून तस्करी होणाऱ्या एमडीवर आता देशी एमडी ड्रग्सचा पर्याय सापडल्यामुळे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे.

शहरात अंमली पदार्थ तस्करी, विक्री आणि सेवन होऊ नये यासाठी पोलीस छापे घालून कारवाई करतात. अंमली पदार्थ प्रतिबंधक पथक आणि नार्को कॉप पथकाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. -राहुल माकणीकर (पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा. नागपूर शहर)