नागपूर: उपराजधानीतील शंकरनगरमधील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहलीला जात असतांना बस चालकाचे नियंत्रण सुटून बस हिंगणा परिसरात उलटली. या अपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमींवर नागपुरातील एम्स रुग्णालयात उपचार सुरू केले आहे. जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले आहे.

एम्स प्रशासनाच्या माहितीनुसार, हिंगणा परिसरात घडलेल्या अपघातानंतर सुमारे ४८ विद्यार्थ्यांना तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले. तेथील आपत्कालीन विभागात दोन वार्ड या विद्यार्थ्यांसाठी तडका- फडकी उघडून सर्व तपासणीची सोय करण्यात आली. येथे तातडीने शस्त्रक्रिया, औषधशास्त्र, क्ष-किरणशास्त्रसह सगळ्याच विभागातील डॉक्टरांना पाचारन करून झटपट तपासणी सुरू केली गेली. त्यात एका विद्यार्थीनीचा आधीच मृत्यू झाल्याचे पुढे आले.

हेही वाचा : भाजपमध्ये मंत्री पदासाठी अंतर्गत स्पर्धा; मुनगंटीवार, भांगडिया, जोरगेवार एकमेकांचे स्पर्धक

विद्यार्थ्यांच्या पोटाला जखम

वैद्यकीय तपासणीत आणखी एका विद्यार्थ्याच्या पोटाला गंभीर इजा झाल्याचे पुढे आले. त्याला तातडीने शस्त्रक्रियेसाठी शल्यक्रियागृहात हलवण्यात आले तर इतर रुग्णांचीही तातडीने त्रास बघत तपासणीचे काम सुरू आहे. दरम्यान येथील सर्व विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसल्याने येथे मानसोपचार तज्ज्ञांचीही चमू तैनात करण्यात आली आहे. या चमूकडून मुलांचे समूपदेशन केले जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांसह नातेवाईकांना माहिती मिळाल्यावर त्यांनीही एम्समध्ये गर्दी केली आहे. त्यांना एम्स प्रशासन, शालेय प्रशासनासह पोलिसांकडून समजावण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे सर्व विद्यार्थी सातवी ते दहावी वर्गातील असल्याची माहिती एम्स प्रशासनाकडून दिली गेली.

घटना काय?

नागपुरातील शंकरनगर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस हिंगणा परिसरातून पर्यटनाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात खाली कोसळली. या विचित्र अपघातात एक विद्यार्थीनी ठार झाली. तर बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले. तातडीने या सगळ्याच विद्यार्थ्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा : नागपूर : सरस्वती शाळेच्या बसचा भीषण अपघात, एक विद्यार्थी ठार, ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी

ट्रॅव्हल्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

सरस्वती शाळेकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक सहलीसाठी खासगी ट्रॅव्हल्सची नोंदणी केली गेली होती. त्यानुसार विद्यार्थी व शिक्षक बसने निघाले. परंतु हिंगणाजवळ अपघात झाल्याने या खासगी बसेसच्या दर्जासह शाळेकडून खासगी बसेसची निवड कशी केली जाते? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एसटी बसेसला प्राधान्य का नाही?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनही (एसटी) बसेस शैक्षणिक सहलीसाठी उपलब्ध केल्या जातात. या बसेसमध्ये गर्ती मर्यादा, प्रशिक्षणीत चालक- वाहकासह इतरही नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. त्यानंतरही शाळांकडून या बसेसला प्राधान्य का दिले जात नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.