बुलढाणा : मलकापूर शहर परिसरात आज ‘हिट अँड रन’ची घटना घडली. परप्रांतातील भरधाव कारने पायी जाणाऱ्या इसमाला उडवले. यात त्याचा करुण अंत झाला. या अपघाताचा अंगावर काटे आणणारा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५३वर हाॅटेल यादगारनजीक आज सोमवारी ही भीषण दुर्घटना घडली. भरधाव चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्यावर अपघातग्रस्त वृद्ध इसम अक्षरशः फुटबॉलसारखा हवेत भिरकावला गेल्याचे ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये दिसून येत आहे. धडक देणारी कार गुजरात राज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अपघातानंतर चालकाने आपली कार काही वेळ थांबवली, मात्र लगेच घटनास्थळावरून पळ काढल्याचे दिसून येत आहे.
या दुर्घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सदर व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नामदेव तुकाराम कवळे (वय ५८) असे मृताचे नाव असून ते मलकापूर तालुक्यातील मौजे कुंड बु. येथील रहिवासी आणि गावाचे पोलीस पाटील असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले.
हेही वाचा >>> जलसंकट कायम, धरणे तहानलेलीच; पाणीटंचाई बुलढाणेकरांच्या मानगुटीला
तालुक्यातील कुंड बु. येथील रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी कुंड बु. फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हाॅटेल यादगारनजीक बस पकडण्यासाठी ते पायी जात होते. त्यावेळी मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव (जीजे-१५, बीएफ-२५६४) कारने कवळे यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते हवेत अक्षरशः भिरगावले गेले आणि दूर अंतरावर जाऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
चालकाने घटनास्थळावरून काढला पळ
अपघात घडल्यानंतर चालकाने आपली कार थांबवील. कारमधून प्रवास करणारे खाली उतरले. त्यांनी कवळे यांना अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेले पाहिले. त्यामुळे पोलीस कारवाईच्या भितीने घटनास्थळी न थांबता त्यांनी पुन्हा कारमध्ये बसून घटनास्थळावरून पलायन केले. त्यांची ही अमानुष आणि असंवेदनशील कृतीदेखील राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हेही वाचा >>> नागपूर : आंबेडकर अनुयायी आक्रमक अन् अवघ्या तासाभरात विधानभवनातून स्थगिती…दीक्षाभूमीच्या भूमिगत वाहनतळविरोधात आंदोलन
परिसरातील व्यावसायिक, पादचारी आणि समाजसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी कवळे यांना तपासले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.
या दुर्दैवी दुर्घटनेप्रकरणी नव्या फोजदारी कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या गुन्ह्याची नोंद मलकापूर शहर पोलीस ठाण्यात झाली. उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने अनामिक राहण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला. त्यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले की, बुलडाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास कायद्यात बदल झाल्यानंतर आज १ जुलै रोजी जिल्ह्यातील पहिला गुन्हा मलकापूर शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. दुर्दैवाने नव्या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद एका व्यक्तीच्या मृत्यूने झाली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आधीच्या कायद्यानुसार अशा प्रकरणांत भादंविच्या कलम ३०४ अ, २७९,३३७, ३३८ नुसार गुन्हा नोंदविला जात होता. मात्र आता नव्या कायद्यानुसार मलकापूर येथील दुर्घटनेत नवीन कायद्यांतर्गत २८१, १०६(१) सहकलम १३४, १३८ अशी कलमे लावण्यात आली.