नागपूर : रामझुला अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मागील आठवड्यात बुधवारी मध्यरात्री अटक केली होती. मध्यरात्री झालेल्या या अटकेची दखल नागपूर सत्र व जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्या.दिनेश सुराणा यांनी घेत स्वत:हून याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणाची सर्व कायदेशीर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देत ३ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने यावर सुनावणी ठेवली आहे.

बुधवारी सत्र न्यायालयाने रामझूला अपघातातील मुख्य आरोपी रितिका मालूचा जामीन फेटाळला आणि अपघातानंतर २१४ दिवसांनी सीआयडीला कारवाई करण्याची परवानगी दिली. यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांनी रात्री १०.३० वाजता कोर्टरूम उघडले. त्यानंतर  काही तासांनी सीआयडीने रितिका मालूला अटक करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने  सूर्यास्तानंतर रितिका मालू हिला अटक करण्यास परवानगी दिली. या आदेश कायद्याच्यादृष्टीने योग्य होता काय? याबाबत न्यायालयाने विचारणा केली.

हेही वाचा >>>अखेर दीक्षाभूमीवर खोदलेले खड्डे बुजवले, धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज

अशी केली कारवाई

 दोन महिला अधिकाऱ्यांसह दहा सीआयडी कर्मचाऱ्यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर मालू कुटुंबातील एका निवासस्थानात प्रवेश करून शोधमोहीम सुरू केली.  दोन पुरुष सहकाऱ्यांसोबत महिला अधिकारी घरातून  सुमारे 40 मिनिटांनंतर रितिका मालूशिवाय घरातून बाहेर पडली आणि त्याच गल्लीतील मालू कुटुंबाच्या दुसऱ्या बंगल्याकडे गेली. पहाटे एकच्या सुमारास, महिला अधिकारी एका बंगल्यातून रितिका मालूला घेऊन बाहेर पडल्या. यावेळी शेजाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा >>>कारागृह पोलीस भरतीत कॉपी करणाऱ्या ‘मुन्नाभाई’ला अटक

अद्याप जामीन अर्ज नाही

रितिका मालू हिला सीआयडीने अटक केल्यावर तिची पोलीस कोठडी मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळत तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. सध्या रितिका मालू मध्यवर्ती कारागृहात आहे. न्यायालयीन कोठडीत असल्याने ती साधारण जामीन मिळविण्यासाठी पात्र आहे. मात्र रितिका मालूच्यावतीने अद्याप जामीनासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. जामीनाचा मार्ग उपलब्ध असताना अर्ज का केला जात नाही आहे, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.काय आहे प्रकरण

२४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर रामझुला पुलावर रितिका मालूने भरधाव वेगात गाडी नेत मोहमद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहमद आतिफ मोहमंद जिया यांना चिरडले होते. अपघातानंतर रितिका आणि तिची मैत्रिण माधुरी शिशिर सारडा या दोघी घटनास्थळावरून फरार होत्या. काही दिवसाने दोघींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत अपघात झाल्याची कबुली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी तहसील पोलिसांनी भादंविच्या कलम २९७, ३३८, आणि ३०४ (अ) अंतर्गत जामीनपात्र गुन्हा दाखल केला होता.