नागपूर : राम झुला अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बुधवारी मध्यरात्री उशिरा तिच्या वर्धमान नगर येथील देशपांडे लेआउट येथील निवासस्थानातून अटक केली. बुधवारी सत्र न्यायालयाने रामझुला अपघातातील मुख्य आरोपी रितिका मालूचा जामीन फेटाळला आणि अपघातानंतर २१४ दिवसांनी सीआयडीला कारवाई करण्याची परवानगी दिली. या अटकेनंतर अनेक नाट्यमय घटना घडल्या.
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांनी रात्री १०:३० वाजता कोर्टरूम उघडण्याचे अभूतपूर्व पाऊल उचलल्यानंतर काही तासांनी सीआयडीने रितिका मालूला अटक करण्याचा निर्णय घेतला. न्यायलयानेसुद्धा आरोपी ही महिला असूनही सूर्यास्तानंतर अटक करण्यास परवानगी दिली, हे विशेष.
हेही वाचा – बीएएमएस पदवीधर होणार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी; आरोग्य खात्याचा निर्णय
अशी केली कारवाई
दोन महिला अधिकाऱ्यांसह दहा सीआयडी कर्मचाऱ्यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर मालू कुटुंबातील एका निवासस्थानात प्रवेश करून शोधमोहीम सुरू केली. दोन पुरुष सहकाऱ्यांसोबत महिला अधिकारी घरातून सुमारे ४० मिनिटांनंतर रितिका मालूशिवाय घरातून बाहेर पडली आणि त्याच गल्लीतील मालू कुटुंबाच्या दुसऱ्या बंगल्याकडे गेली. पहाटे एकच्या सुमारास, महिला अधिकारी एका बंगल्यातून रितिका मालूला घेऊन बाहेर पडल्या. यावेळी शेजाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा – लोकजागर: गडचिरोलीचे यश!
काय आहे प्रकरण?
२४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर रामझुला पुलावर रितिका मालूने भरधाव वेगात गाडी नेत मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांना चिरडले होते. अपघातानंतर रितिका आणि तिची मैत्रिण माधुरी शिशिर सारडा या दोघी घटनास्थळावरून फरार होत्या. काही दिवसाने दोघींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत अपघात झाल्याची कबुली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी तहसील पोलिसांनी भादंविच्या कलम २९७, ३३८, आणि ३०४ (अ) अंतर्गत जामीनपात्र गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाला केली विनंती
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एखाद्या महिला आरोपीला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही. परंतु, महिला आरोपीला अटक करण्यासाठी सबळ कारण असेल किंवा आरोपी राज्यातून, देशातून पळून जाण्याची शक्यता असेल तर तपास अधिकाऱ्यांना ज्या न्यायालयात प्रकरण सुरु आहे त्या न्यायधिशांना विनंती करता येते. न्यायालयाच्या परवानगीने महिला आरोपीला सूर्यास्थानंतर सुद्धा अटक करता येते.