भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नागपूर शहर आणि जिल्हा मिळून एकूण ६ लाख ७२ हजार २६२ ध्वजाची मागणी असून आतापर्यंत शासनाकडून जिल्ह्याला एक लाखच ध्वज मिळाले आहे.

दरम्यान नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी केले.

प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी –

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गंत विभागातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापना आणि घरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी केली जात आहे. झेडे नागरिकांनी स्वखर्चाने खरेदी करायचे आहेत. ध्वज फडकावताना ध्वजसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे.

केंद्र शासनाकडून आतापर्यंत एक लाख ध्वज प्राप्त –

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात ३,७२,२६२ व महापालिका क्षेत्रात ६,२८,२४५ अशी एकूण १० लाख ५०७ घरे व अस्थापनांची संख्या आहे. एकूण ६लाख ७२ हजार २६२ ध्वजांची मागणी आहे. त्यापैकी ५ लाख ७२हजार २६२ ध्वज उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. केंद्र शासनाकडून आतापर्यंत एक लाख ध्वज प्राप्त झाले आहे. ते ग्रामीण भागात वितरित करण्यात आले आहे. सामाजिक संस्थांकडून काही झेंडे देणगी स्वरुपात दिले जाणार असून सर्व सामान्यांसाठी एकूण ८०८ ध्वज विक्री सुरू करण्यात येणार आहे.