नागपूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांचा बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननातही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री व बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यानी नागपुरात याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी मुंडे बुधवारी रात्री नागपुरात आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या.
वाळू उत्खननासाठी आमच्या विभागाची पर्यावरणीय परवानगी लागते. मात्र तो विषय प्रामुख्याने महसूल विभागाचा आहे. वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागते. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झाली आहे. अवैध वाळू उत्खननामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबतच स्थानिक पातळीवर गुंडागर्दी ही वाढते. मात्र वाळूचे मर्यादित उत्खनन करणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे नदी पात्राचे खोलीकरण होते, पाणी जमिनीत मुरते त्यामुळे वाळू उत्खननाच्या संदर्भात समतोल साधणे आवश्यक आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
नद्यांचे पुनरूज्जीवन
नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही लोकांशी भेटत आहोत. लोकांकडून येणाऱ्या सूचनानुसार लवकरच नवीन नियोजन राज्यसमोर सादर करू, असे मुंडे यांनी सांगितले. नद्या दुर्लक्षित आहे, त्यांची जबाबदारी कोणीही घेत नाही. नदी राज्याची आणि देशाची संपत्ती आहे म्हणून आम्ही त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नियोजन करत आहोत, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.