नागपूर : देशातील विविध राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड तापमान वाढ दिसून आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडी घट झाली असून काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातही काही भागात थंडी जाणवू लागली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा : चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले
अरबी समुद्रात “तेज” चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात “हमून” चक्रीवादळ तयार झाले आहे. २०१८ नंतर प्रथमच एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. हवामान खाते यावर लक्ष ठेवून आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर आणि गुजरातवर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. गुजरातमध्ये आगामी पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे तर महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळाचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.