नागपूर : कारागृहात बंदिस्त कैद्यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक दररोज मोठ्या संख्येत मध्यवर्ती कारागृहात येतात. राज्याच्या विविध जिल्ह्यातून हे लोक येतात. यात त्यांचा पैसा आणि वेळही खर्ची होतो. अनेकदा तर तास न् तास प्रतीक्षा करावी लागते. ही बाब लक्षात घेता कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे आणि उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनात आता ‘ई-भेटी’ची सुविधा प्रदान करण्यात येत आहे. आता बंद्यांना ‘व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंग’च्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांशी बोलता येईल.
नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस अधीक्षक वैभव आगे आणि त्यांच्या पथकाने कारागृहात कैद्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना या ‘ई-भेट’ प्रणालीबाबत माहिती दिली. आगे यांनी सांगितले की, बंद्यांना रक्ताचे नातेवाईक आणि वकिलांना भेटण्याची परवानगी असते. शिक्षा भोगत असलेल्या बंद्यांना महिन्यातून दोन वेळा आणि विचाराधीन बंद्यांना आठवड्यातून एकदा आपल्या नातेवाईकांना भेटण्याचा नियम आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात मुंबई ते गडचिरोलीपर्यंत विविध जिल्ह्यांचे कैदी बंद आहेत. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांना पैसे खर्च करून नागपूरला यावे लागते. त्यानंतर भेटीची परवानगी घेऊन नंबर येण्याची प्रतीक्षा करावी लागते. मात्र ‘ई-भेट’ हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे बंद्यांच्या नातेवाईकांचे श्रम आणि पैसे दोन्हींची बचत होईल. नोंदणी करण्यासोबतच भेटीची नोंदणी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती नातेवाईकांना दिली जात आहे.
अशी करावी नोंदणी
‘व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंग’च्या माध्यमातून भेट घेण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर ‘ई-प्रिझन’ या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर “ई-प्रिझन.एनआयसी.इन’ ही लिंक मिळेल. या पेजवर जाऊन “ई-मुलाखत’वर ‘क्लिक’ करताच एक पान उघडेल. यामध्ये वकील किंवा नातेवाईक ज्यांना भेट घ्यायची असेल त्याची सर्व माहिती भरावी लागेल. ‘आयडी प्रूफ’साठी केवळ आधार कार्डची निवड करावी आणि समोरच्या ‘बॉक्स’मध्ये आपल्या आधार कार्डचा नंबर टाकावा. सोबतच ‘ई-मेल आयडी’ आणि मोबाईल क्रमांकही टाकावा. त्यानंतर एक ‘वन टाईम पासवर्ड’ (ओटीपी) मिळेल. त्यानंतर दुसऱ्या बाजूला बंद्याची माहिती, ई-भेटीची तारीख आणि ‘व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंग’चा पर्याय निवडावा लागेल. ‘कॅप्चा कोड’ टाकल्यानंतर ओटीपी मिळेल. सोबतच ‘व्हिजिट रेफरन्स’ क्रमांक येईल. तो क्रमांक वकील किंवा नातेवाईकाला स्वत:कडे लिहून ठेवावा लागेल.
कारागृह विभागाकडून मिळेल वेळ
नोंद ‘ईमेल आयडी’ आणि मोबाईल क्रमांकावर कारागृह विभागाकडून भेटीची वेळ मिळेल. आगे यांनी सांगितले की, आधुनिक युगात आज जवळपास प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे ‘स्मार्टफोन’ आहे. त्याद्वारे सहजरित्या वरील दिशा-निर्देशांनुसार नोंदणी केली जाऊ शकते. आपला वेळ, पैसा आणि श्रम वाचविण्यासाठी लोकांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.