नागपूर : नागपूरमध्ये २० मार्चपासून सुरू होणाऱ्या जी-२० अंतर्गत सी-२० बैठकीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराचे सुशोभिकरणा करण्यात आले आहे. आकर्षक वृक्षांची लागवड, राष्ट्रध्वजांसाठी उभारण्यात आलेले खांब, परिसरातील भिंतीवर चितारण्यात
येत असलेली आकर्षक चित्रे यामुळे या परिसराचे रुपच पालटले आहे.
सी-२० परिषदेसाठी येणाऱ्या देश-विदेशातील प्रतिनिधींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवले जात आहे. नागपूर विमानतळापासून तर प्रतिनिधींच्या भेटीस्थळापर्यंतचे विविध मार्ग सुशोभित केले जात आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून विमानतळ परिसरात सुशोभिकरण केले जात आहे. विमानतळातून बाहेर पडल्यापासून जवळपास १ कि.मी. अंतरापर्यंतच्या परिसरात विविध प्रजातींची फुलझाडे, तसेच वर्तुळाकार, त्रिकोणी आणि वेटोळ्या आकाराची टॉपअरी झाडे लावण्यात येत आहेत.
हेही वाचा – नागपूर: राज्यात पोलिसांविरोधातच तक्रारी वाढल्या; पाच वर्षांत चार हजारांवर तक्रारी
हेही वाचा – धक्कादायक! समाज माध्यमावर बनावट खाते उघडून बेरोजगार मुलींशी अश्लील चाळे
विमानतळ मार्गावर मोक्याच्या ठिकाणी शिखर परिषदेचे सदस्य राष्ट्रांचे ध्वज लावण्यासाठी दुतर्फा ध्वज खांब उभारण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा ८ ते ९ फुट उंचीचे कोणाकार्पस वृक्ष लावण्यात येत आहेत. रंगीबेरंगी फुलांची पुष्प वाटिका तयार करण्यात आली आहे. टर्मिनल डोम परिसरात टायगर कॅपीटल आणि संत्रानगरी ही नागपूरची ओळख दर्शविणाऱ्या आकर्षक प्रतिमा येथे साकारण्यात येणार आहेत.