नागपूर : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांची मदत घेतली जात आहे. सामान्य नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला जाईल. भविष्यात शहराची ‘क्राईम कॅपिटल’ नव्हे तर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नागपूर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले. ते प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’ उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी प्रेस क्लबचे पदाधिकारी डॉ. शिरीष बोरकर आणि प्रदीप मैत्र उपस्थित होते.
डॉ. सिंगल म्हणाले, की माझ्या कार्यालयात येणारा प्रत्येक व्यक्ती तिकिटाचे पैसे खर्च करून येतो, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीला मी गांभीर्याने घेतो. सध्या नागपुरात आर्थिक गुन्हे वाढताना दिसत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. सायबर क्राईमच्या तक्रारीसुद्धा वाढत असल्यामुळे अनुभवी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती सायबर विभागात करण्यात येत आहे. पिस्तुलाचा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारांची अचानक झाडाझडती घेण्यात येत आहे. तसेच पिस्तूलची विक्री करणाऱ्या टोळ्या रडारवर आहेत. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही समस्या लक्षात घेत वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्यावर सार्वत्रिक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहनचालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे.
हेही वाचा – नागपूर : तरुणीला नोकरीचे आमिष; जंगलात नेऊन बलात्कार
मोठ्या हॉटेल, दुकानांपुढील वाहनांवर कारवाई
मोठ्या हॉटेल आणि दुकानदारांकडून वाहतूक पोलीस पैसे घेतात, त्यामुळे दुकानासमोरील वाहनांवर कारवाई होत नाही, असे विचारताच आयुक्त म्हणाले, की यानंतर कुणालाही सूट दिली जाणार नाही. कायद्यासमोर सर्व समान आहेत. मध्यरात्रीनंतरही वाडी, हिंगणा, एमआयडीसी, कोराडी, हुडकेश्वर, वाठोडा हद्दीतील ढाबे सुरू असतात, त्यांच्यावरही कारवाईचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले.
महिलांच्या तक्रारींना प्राधान्य
पोलीस ठाण्यात महिला तक्रारदारांशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सौजन्याने वागत नाहीत. लैंगिक शोषणाची तक्रार असल्यास पोलीस महिलेला बदनामीची भीती दाखवतात. तसेच महिलांना उलटसुलट प्रश्न विचारून ठाण्यातून पिटाळून लावतात. पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी नागरिकांशीसुद्धा सौजन्याने वागत नाहीत. पोलिसांच्या अशा भूमिकेमुळेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जाण्याची भीती वाटते, या प्रश्नावर बोलताना आयुक्त म्हणाले की, अशी वागणूक दिल्यास थेट पोलीस निरीक्षकांवर कारवाई करणार.
हेही वाचा – अखेर मीरा फडणीस आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; सहा जणांची ४७ लाखांनी फसवणूक
डीबी पथकाचे गुन्हेगारांशी संबंध
पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांशी संबंध असतात. त्यासाठी महिन्याकाठी मोठी रक्कम डीबी पथक म्हणजेच ठाणेदारापर्यंत पोहोचते. अवैध धंदेवाल्यांशी गुन्हे शाखेच्या युनिटच्या अधिकाऱ्यांचीही वसुली असते. वस्तीतील गुन्हेगार आणि अवैध धंदे चालवणाऱ्याची यादी डीबी पथकाकडे असते, परंतु कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे का? यावर डॉ. सिंगल म्हणाले की. ज्या पोलीस कर्मचाऱ्याचे असे संबंध असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.