महेश बोकडे

शहरात २५ लहान- मोठय़ा समूहांची स्थापना; विविध उपक्रमांद्वारे धावण्याबाबत जनजागृती

लठ्ठपणासह इतर आजारांवर नियंत्रणासाठी हल्ली अनेक नागपूरकर पहाटे उठून धावायला लागले आहेत. रोज सकाळी सेमिनरी हिल्सपासून शहरातील विविध रस्ते, मैदान, उद्यानांमध्ये धावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. नागरिकांना धावण्यासाठी प्रोत्साहन देणारे शहरात लहान-मोठे २५ समूह कार्यान्वित असून ते विविध स्पर्धाही आयोजित करीत असतात.

उपराजधानीत धावणाऱ्यांचा ऑरेंजसिटी रनर्स नावाचा सर्वात मोठा समूह आहे. त्यानंतर डॉ. अमित समर्थ, अतुल चौकसे यांच्यासह केंद्रीय आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह इतरही लहान-मोठे २५ समूह रोज सकाळी शहराच्या चारही भागात धावत असतात. या समूहाकडून २ ते ३५ किलोमीटपर्यंतची स्पर्धाही आयोजित केली जाते. त्यासाठी बहुतांश समूह हे सिमेनरी हिल्स परिसरातील बाल उद्यान जवळून फुटाळा तलावपर्यंत, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी परिसरातील मार्ग, लक्ष्मी नारायण इन्स्टिटय़ूट परिसर, नागपूर विद्यापीठाचे मैदान, तिरपुडे महाविद्यालयाचे मैदान या ठिकाणांनाच पसंती देतात. या भागात वाहतुकीची वर्दळ कमी असण्यासह पर्याप्त सुरक्षेचे उपाय हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. धावण्याचा व्यायाम करणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश असला तरी सर्वाधिक संख्या ही ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांची दिसते. ऑरेंजसिटी रनर्स नावाच्या ग्रुपमध्ये २०१४ मध्ये पाच जणांनी धावण्याचा व्यायाम करण्याला सुरुवात केली होती, परंतु २०१८ मध्ये ही संख्या ३०० च्या घरात पोहोचली आहे. इतरही ग्रुपच्या बाबतीत ही स्थिती या पद्धतीनेच वाढत आहे. या ग्रुपमध्ये डॉक्टर, सीए, अभियंता, व्यावसायिकांसह इतरही गटातील नागरिकांचा समावेश आहे.

सर्वात स्वस्त व्यायाम

हल्ली व्यायाम करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक असलेले जीम लावल्यास वर्षांला १२ हजार रुपयांपासून कमी-अधिक रक्कम जीमच्या दर्जानुसार द्यावी लागते. गरीब आणि मध्यमवर्गीयांना एवढा खर्च झेपत नाही. त्यामुळे पैसा खर्च न करता सर्वात स्वस्त असलेला व्यायाम म्हणून धावण्याकडे बघितले जाते.

चार वर्षांपूर्वी मला चालणे होत नव्हते. डॉक्टरांनी दोन्ही गुडघ्यांवर प्रत्यारोपणाचा सल्ला दिला, परंतु सुरुवातीला शस्त्रक्रिया करायची नसल्यामुळे बैठय़ा जीवनशैलीकडे माझी वाटचाल सुरू झाली. त्यामुळे लठ्ठपणासह मधुमेहाच्या आजाराने ग्रासले. त्यानंतर हिंमत करून पुन्हा चालण्याचा प्रयत्न केला, परंतु चालताना प्रचंड वेदना होत होत्या. शेवटी शस्त्रक्रियेच्या निर्णयापर्यंत मी पोहोचलो होतो. दरम्यान, एका मित्राने मुंबईतील क्रीडा क्षेत्राचे जाणकार व शल्यचिकित्सक डॉ. अनंत जोशी यांचा सल्ला घेण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार व्यायाम सुरू केला. सुरुवातीला १५ दिवस त्रास झाला, परंतु त्यानंतर आराम पडला. आता मी वयाच्या ५५ व्या वर्षी धावण्याच्या १६१ किलोमीटपर्यंतच्या स्पर्धेसह सायकलिंग, स्वीमिंगच्याही स्पर्धेत सहभाग घेत आहे. माझे वजन कमी झाले असून गुडघादुखीसह मधुमेहाचा आजारही बरा झाला आहे.

– राजेंद्र जयस्वाल, बांधकाम व्यावसायिक

शहरात धावण्याच्या व्यायाम करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत असून सुमारे २५ लहान-मोठय़ा  समूहाचा त्यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे. सर्वात मोठा समूह वाढवण्यात डॉ. निना साहू यांची भूमिका महत्त्वाची आहे. या व्यायामासाठी सकाळी लवकर उठावे लागते. त्यसाठी रात्री लवकर झोपावे लागते. त्यामुळे आयुष्यात एक चांगली शिस्त लागण्यास मदत होते.

– डॉ. मोहम्मद सोहेब, फिजिओथेरपीस्ट

Story img Loader